जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 10:15 IST2025-10-21T10:14:23+5:302025-10-21T10:15:18+5:30
Japan New PM Sanae Takaichi : जपानच्या इतिहासात पहिल्यांदा महिला पंतप्रधान! LDP च्या ताकाईची यांचा विजय, चीनशी तणाव आणि आर्थिक सुधारणांवर भर. जागतिक राजकारणातील मोठी घटना.

जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
टोकियो: जपानच्या राजकारणात एक ऐतिहासिक दिवस उजाडला आहे. जपानच्या संसदेने अल्ट्राकंजरवेटिव्ह नेत्या सनाई ताकाईची (Sanae Takaichi) यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड केली आहे.
पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या वर्षभराच्या कार्यकाळानंतर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ताकाईची यांची निवड झाली आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने जुलै २०२५ च्या निवडणुकीत पराभवानंतर सत्ता परत मिळवण्यासाठी ओसाका-स्थित जपान इनोव्हेशन पार्टीसोबत युती केली होती. तरीही या युतीला दोन्ही सभागृहात स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. यामुळे ताकाईची यांचे सरकार अस्थिर राहणार असून त्यांना सरकार टिकविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
राजकीय स्थैर्य आवश्यक - ताकाईची
युती करारावर स्वाक्षरी करताना ताकाईची यांनी स्पष्ट केले की, "राजकीय स्थैर्य सध्या अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय आपण मजबूत अर्थव्यवस्था आणि प्रभावी धोरणे पुढे नेऊ शकत नाही."
आबे यांच्या निकटवर्तीय, धोरणे काय असतील?
सनाई ताकाईची या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात. त्या आबे यांच्या धोरणांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. जपानच्या शांततावादी संविधानात सुधारणा करणे. देशाचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर देणे. शिंजो आबे यांच्या 'अबिनॉमिक्स'च्या धर्तीवर आर्थिक सुधारणांना गती देणे, यावर त्या काम करण्याची शक्यता आहे.
ताकाईची हा महिला असून देखील महिला सक्षमीकरण किंवा विविधता या मुद्द्यांवर फारसा रस नाही, असे सांगितले जाते. त्या समलिंगी विवाह तसेच विवाहित जोडप्यांसाठी वेगळे-वेगळे आडनाव ठेवण्यास विरोध करतात. त्यांच्या अति-राष्ट्रवादी विचारांमुळे आणि यासुकुनी मंदिराला भेट देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे चीन आणि दक्षिण कोरियाने यापूर्वीही तीव्र आक्षेप घेतला आहे. यामुळे जागतिक स्तरावर त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरण्याची देखील शक्यता आहे.
आव्हाने...
सध्या ताकाईची यांच्या समोर महागाई नियंत्रण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध आणि तातडीचे आर्थिक पॅकेज यासारख्या महत्त्वाच्या समस्यांवर काम करण्याचे मोठे आव्हान आहे. LDP चा जुना मित्र कोमेटो पक्ष त्यांच्या राष्ट्रवादी धोरणांवरून आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून युतीतून बाहेर पडला आहे, ज्यामुळे ताकाईची यांच्या सरकारचा पाया आणखी कमकुवत झाला आहे.