Hiroshima Day 2025 : तब्बल ८० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, म्हणजेच ६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर 'लिटिल बॉय' नावाचा अणुबॉम्ब टाकला गेला होता. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्याचा विध्वंस अवघ्या जगाने पाहिला होता. इतकंच नाही तर, जपानचे हे शहर अशाप्रकारे उद्ध्वस्त झाले की, पुढच्या कैक पिढ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. ही घटना मानवी इतिहासातील सर्वात विनाशकारी घटनांपैकी एक होती. सकाळी ८.१५ वाजता झालेल्या या हल्ल्यामुळे हिरोशिमा क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
या हल्ल्यात तब्बल एक लाख ४० हजार लोक मृत्युमुखी पडले, तर बचावलेल्यांना किरणोत्सर्गाचे दीर्घकालीन दुष्परिणाम सहन करावे लागले. या दुर्घटनेने अण्वस्त्र किती खतरनाक आहेत, याची जगाला जाणीव करून दिली. आजही या घटनेच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या आहेत.
युद्धाचा विनाशकारी परिणामदरवर्षी ६ ऑगस्ट रोजी 'हिरोशिमा दिवस' साजरा केला जातो. जंगल शांती, अहिंसा आणि जागतिक एकतेचा संदेश देणं, हा या दिवसाचा उद्देश आहे. हिरोशिमाची घटना ही केवळ एक ऐतिहासिक सत्य नाही, तर मानवतेसाठी एक खोल इशारा आहे. युद्ध आणि हिंसाचाराचे परिणाम फक्त विनाशकारी आणि दुःखद आहेत, हे याने दिवसाने सगळ्यांना दाखवून दिले. हा दिवस आपल्याला अणु निःशस्त्रीकरण आणि जागतिक शांततेचे महत्त्व पटवून देणारा आहे.
या घटनेच्या तब्बल ८० वर्षांनंतरही आजच्या दिवशी म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी अनेक लोक हिरोशिमा येथील शांतता स्मारकाजवळ एकत्र जमतात आणि श्रद्धांजली वाहतात. यासोबतच जगभरात शांती नांदावी यासाठी प्रार्थना करतात. हिरोशिमा दिन हा पर्यावरण संरक्षण, मानवी हक्क आणि अहिंसेबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा दिन आहे.