दिसत नसताना तो २२५३ कि.मी.पळत गेला; आता लक्ष दक्षिण कोरिया! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 07:32 AM2024-01-22T07:32:47+5:302024-01-22T07:33:33+5:30

१०० कि.मी.ची अंटार्क्टिक आइस मॅरेथाॅन ही अवघड मॅरेथाॅन पूर्ण करणारा गॅरी लिऊंग हाँगकाँगमधील पहिली दृष्टिहीन व्यक्ती आहे.

He ran 2253 km without being seen... | दिसत नसताना तो २२५३ कि.मी.पळत गेला; आता लक्ष दक्षिण कोरिया! 

दिसत नसताना तो २२५३ कि.मी.पळत गेला; आता लक्ष दक्षिण कोरिया! 

‘अडथळा किती का मोठा असेना पण इच्छाशक्ती दांडगी असेल तर माणूस कोणताही अचाट पराक्रम करू शकतो!’  हे ध्येय उराशी बाळगलं म्हणूनच हाँगकाँगच्या गॅरी लिऊंगला एरवी धडधाकट माणसांनाही अशक्य वाटावं असं ध्येय गाठता आलं. गॅरी लिऊंग हा ५० वर्षाचा धावपटू. या धावपटूने दृष्टिहीन असतानाही अवघड वाटावे असे रस्ते सहज पार केले आहेत. जन्मत:च डोळ्यांच्या पडद्याचा दुर्मीळ आजार असलेल्या गॅरीला जे जग आपण आज पाहतो आहोत ते आयुष्यात एका टप्प्यावर आपण कधीच पाहू शकणार नाही, असं कधीही वाटलं नव्हतं. पण २५ वर्षांचा असताना त्याची दृष्टी हळूहळू कमी होत एक दिवस पूर्ण नाहीशी झाली. ऐन तारुण्यात असलेला गॅरी कोसळला. नैराश्यात गेला. आपल्या आयुष्यात हा अंधार आता कायमचाच असणार या वास्तवाने हतबल झालेल्या गॅरीच्या मनात अनेकदा आत्महत्येचे विचार आले. आयुष्यात आलेल्या अंधारात हरवून गेलेल्या गॅरीला आपलं वास्तव बदलण्याचा एक मार्ग दिसला. तो मार्ग होता धावण्याचा. 

गॅरी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा उभा राहिला. धावताधावता आत्मविश्वास कमावत गेलेल्या गॅरीला मग अशक्य आव्हानं साद घालू लागली.  ती आव्हानं पूर्ण करता करता गॅरीच्या नावावर नवनवे विक्रम जमा होत गेले. त्याच्याकडे बघून त्याच्यासारख्या इतर मुलांना, तरुणांना प्रेरणा मिळत राहिली. खरंतर याचसाठी गॅरीने अवघड रस्त्यांवरून मैलोनमैल धावण्याचा अट्टाहास केला. त्याला काही हे विक्रम करून ‘पाहा दृष्टिहीन असून मी किती पराक्रमी आहे’ हे जगाला दाखवायचंच नव्हतं. त्याला अपंगत्वाने, दुर्धर आजाराने उमेद हरवून बसलेल्या तरुण मुला-मुलींना ‘तरीही हे शक्य आहे’ हे सांगणारा रस्ता दाखवायचा होता. हे आपल्याला जमलं म्हणून गॅरी आज आनंदाने जगतो आहे. नवनवीन मोहिमांचे आराखडे तयार करतो आहे.

१०० कि.मी.ची अंटार्क्टिक आइस मॅरेथाॅन ही अवघड मॅरेथाॅन पूर्ण करणारा गॅरी लिऊंग हाँगकाँगमधील पहिली दृष्टिहीन व्यक्ती आहे. गॅरीने गोबीच्या वाळवंटातील जगातील अतिशय अवघड असणारी ४००  कि.मी.ची ‘अल्ट्रा गोबी’ शर्यतही पूर्ण केली आहे. गॅरीने नुकतीच २३०० कि.मी.ची जपानची ‘डार्क रन मॅरेथाॅन’ ४० दिवसात पूर्ण केली. जपानच्या क्युशू बेटावरील कागोशिमा शहरातून सुरू झालेली ही मॅरेथाॅन जपानच्या हुंशू या मुख्य बेटापर्यंत होती. ही मॅरेथाॅन गॅरी लिऊंग याने गाइड रनरच्या सोबतीने पूर्ण केली. हे गाइड रनर विशिष्ट अंतरानंतर बदलत होते.  धावताना गाइड रनरचा हात आणि गॅरीचा हात एका दोरीने बांधलेला होता. ही मॅरेथाॅन गॅरीसाठी अजिबात सोपी नव्हती. अरुंद रस्त्यांवर गाइड रनरसोबत धावणं अनेकदा गॅरीसाठी अवघड झालं होतं. अशा वेळेस मुख्य रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्यावरून गॅरीला मॅरेथाॅनच्या मुख्य रस्त्यावर यावं लागत होतं. अनेक अडथळे येऊनही गॅरीने ठरवलेल्या वेळेतच ही मॅरेथाॅन पूर्ण केली.

जपानमधली  डार्क रन मॅरेथाॅन गॅरीने पूर्ण केली ती हाँगकाँगमधील ‘रोली पोली इनक्ल्युजन स्पोर्टस असोसिएशन’ या सेवाभावी संघटनेकरता आर्थिक मदत उभी करण्यासाठी. ही मॅरेथाॅन पूर्ण करून गॅरीने या संघटनेसाठी ३८,००० अमेरिकन डाॅलरची मदत मिळवून दिली. अवघडातली अवघड मॅरेथाॅन पूर्ण करून आपल्या शारीरिक व्यंगावर, कमतरतेवर आपण मात करू शकतो. डोळ्यासमोरचा अंधार आपल्याला मॅरेथाॅन पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही, हेच गॅरीला त्याच्यासारख्या मुला-मुलींना दाखवून द्यायचं होतं. शारीरिक कमतरतेने कधीच नाऊमेद व्हायचं नसतं. उलट ती जेव्हा असते तेव्हाच आपण धडपडून आपल्यातले इतर गुण, कौशल्य शोधतो यावर गॅरीचा विश्वास आहे. शारीरिक कमतरतेला आपल्यातलं सर्व साहस एकवटून सामोरं गेलं तर स्वत:ला आणि इतरांनाही उमेदीने जगण्याचं बळ आपण देऊ शकतो. त्याच्यासारख्या अनेकांना हे बळ  देण्यासाठीच तर गॅरी धावत सुटलाय.

आता लक्ष दक्षिण कोरिया! 
गॅरी लिऊंग हा हाँगकाँगमधील पहिला दृष्टिहीन धावपटू आहे ज्याला ‘लाँग डिस्टन्स कोचिंग लायसन्स’ मिळालेलं आहे. या लायसन्सच्या बळावरच गॅरी लिऊंग त्याच्यासारख्या दृष्टिहीनांचे पाय धावण्यासाठी बळकट करत आहे. २०२४ च्या एप्रिलमध्ये गॅरी २५० कि.मी.ची मोरोक्को ते फ्रान्स ही वाळवंटातली शर्यत धावणार आहे. त्याला दक्षिण कोरियाचा परीघ धावून पूर्ण करायचा आहे. हे लक्ष्य गाठताना आताही स्वत:मधल्या अडथळ्यांवर मात करून लांबवर धावण्याची धुरा त्याला त्याच्यासारख्या तरुणावर सोपवायची आहे. सतत लांब पल्ल्यांवर धावू शकू इतके आपण तरुण राहिलेलो नाही असं आता गॅरीला वाटतं आहे.

Web Title: He ran 2253 km without being seen...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.