"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:41 IST2025-08-03T15:40:01+5:302025-08-03T15:41:27+5:30
हमासने आतापर्यंत अनेक इस्रायली लोकांना ओलीस ठेवलं आहे. एका व्हिडिओमध्ये, ओलीस ठेवलेला एक व्यक्ती एका बोगद्यात स्वतःची कबर खोदत असल्याचं म्हणत आहे.

"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
हमासने आतापर्यंत अनेक इस्रायली लोकांना ओलीस ठेवलं आहे. एका व्हिडिओमध्ये, ओलीस ठेवलेला एक व्यक्ती एका बोगद्यात स्वतःची कबर खोदत असल्याचं म्हणत आहे. पॅलेस्टिनी संघटना हमासने ४८ तासांत २४ वर्षीय एव्यातार डेव्हिडचा हा दुसरा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये डेव्हिड खूप कमकुवत झालेला दिसत आहे. बोलणंही त्याच्यासाठी अवघड झालं आहे. हमासने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये तो बोगद्यात खोदकाम करताना दिसत आहे. तो कॅमेऱ्यासमोर अतिशय हळू आवाजात बोलतो.
डेव्हिड हिब्रूमध्ये म्हणतो, "मी आता माझी स्वतःची कबर खोदत आहे. दररोज माझं शरीर कमकुवत होत आहे. मी थेट माझ्या कबरीत जात आहे. ही तीच कबर आहे जिथे मला दफन केलं जाईल. माझ्या कुटुंबासह माझ्या बेडवर झोपण्याची वेळ संपत आली आहे." यानंतर डेव्हिड रडू लागतो. त्याच्या कुटुंबाने व्हिडीओ प्रसिद्ध करण्यास परवानगी दिली आहे.
How psychopathic is Hamas?
— Eylon Levy (@EylonALevy) August 2, 2025
It forced starving hostage Evyatar David to DIG HIS OWN GRAVE for the cameras. pic.twitter.com/iMa404St4s
एका निवेदनात कुटुंबीयांनी म्हटलं आहे की, "एका प्रचार मोहिमेचा भाग म्हणून आमच्या मुलाला जाणूनबुजून उपाशी ठेवणं ही जगाने पाहिलेल्या सर्वात भयानक घटनांपैकी एक घटना आहे. फक्त हमासच्या प्रचारासाठी त्याला उपाशी ठेवले जात आहे." या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर पंतप्रधानांनी डेव्हिडच्या कुटुंबाशी बोलून त्यांचं सांत्वन केलं असं इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितलं. सर्व ओलिसांची सुटका करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं नेतन्याहू म्हणाले. हमासने ओलिसांना जाणूनबुजून उपाशी ठेवल्याचा आणि निंदनीय आणि क्रूर पद्धतीने त्याचा प्रसार केल्याचा आरोप नेतन्याहू यांनी केला आहे.