हमासने आणखी ३ इस्रायली ओलिसांना सोडले, त्याबदल्यात इस्रायलकडून १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 17:48 IST2025-02-15T17:47:55+5:302025-02-15T17:48:28+5:30
हमास संघटनेने ओलिसांना सोडल्यानंतर, इस्रायलने १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांनाही सोडले आहे.

हमासने आणखी ३ इस्रायली ओलिसांना सोडले, त्याबदल्यात इस्रायलकडून १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका!
गाझा: हमास संघटनेने आणखी तीन इस्रायली ओलिसांची सुटका केली. गाझा युद्धबंदी अंतर्गत शनिवारी हमास संघटनेने कडक सुरक्षेत इस्रायली ओलिसांना मुक्त केले. दरम्यान, हमास संघटनेने ओलिसांना सोडल्यानंतर, इस्रायलने १०० हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांनाही सोडले आहे.
सुरुवातीला हमास संघटना इस्रायली ओलिसांना सोडण्यास टाळाटाळ करत होती. मात्र, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कडक भूमिकेनंतर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडक इशाऱ्यानंतर, हमास संघटनेने इस्रायली ओलिसांना सोडण्याचा निर्णय घेतला.
हमास संघटनेने तीन ओलिसांना सोडले असून त्यांना गाझा पट्टीतील रेड क्रॉसकडे सोपवले आहे, असे इस्रायलने म्हटले आहे. सुटका करण्यात आलेले तीन लोक आपल्यासोबत आहेत. त्यांना सर्वात आधी रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असे इस्रायलच्या सैन्याने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.
दरम्यान, आयर हॉर्न (४६), सागुई डेकेल चेन (३६) आणि अलेक्झांडर (साशा) ट्रोफानोव्ह (२९) अशी हमासने सोडलेल्या इस्रायली ओलिसांची नावे आहेत. या तिघांचे ७ ऑक्टोबर २०२३ रोजी अपहरण करण्यात आले होते. तसेच, आज सोडण्यात आलेले हे तिघेही थकलेले दिसून येत होते. मात्र, गेल्या शनिवारी सोडण्यात आलेल्या तिघांपेक्षा यांची प्रकृती चांगली असल्याचे म्हटले जात आहे.