Hamas Leaders in Pakistan : पाकिस्तान जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना आश्रय देयो, हे सर्वश्रुत आहे. आतापर्यंत भारतातदहशतवादी कारवाया करणारे सर्व दहशतवादी पाकिस्तानात खुलेपणाने फिरतात. आता पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांनाही आश्रय देत असल्याचे समोर आले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Pok) भारतविरोधी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत हमासचे नेते सहभागी झाल्यामुळे, ही परिषद खूप चर्चेत आली.
पाकिस्तानमध्ये 5 फेब्रुवारी रोजी 'अल अक्सा फ्लड कॉन्फरन्स' आयोजित करण्यात आली होती. यावेळी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफ आणि जैश कमांडर असगर खान काश्मिरी उपस्थित होते. विशेष म्हणजे, येथे जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी या कार्यक्रमात हमास नेत्यांचे अतिशय जंगी स्वागत केले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत हमासचे नेते आलिशान एसयूव्हीमध्ये रावळकोटमधील शहीद साबीर स्टेडियममध्ये जात असल्याचे पाहायला मिळते. या एसयूव्हीच्या पुढे आणि मागे दुचाकी आणि घोड्यांवर जैश आणि लष्करचे दहशतवादी त्यांचे स्वागत करताना दिसतात. दुसऱ्या व्हिडिओमध्ये जैश आणि लष्करचे दहशतवादी पॅलेस्टिनी झेंडे असलेल्या दुचाकी आणि घोड्यांवर दिसत आहेत. हमासचे नेते येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केल्याचेही व्हिडिओत दिसत आहे.