हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 06:45 IST2026-04-10T06:44:48+5:302026-04-10T06:45:26+5:30
हॅकर गटाची दोन देशांना धमकी

हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
वाॅशिंग्टन: अस्थिर युद्धविराम इराणशी संबंधित हॅकर गटांना दीर्घकाळ रोखू शकणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. इराण पुरस्कृत हॅकर समूहांनी सायबर हल्ले सुरूच राहतील असा इशारा दिला असून, अमेरिकी सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी हा इशारा गांभीर्याने घ्यावे असे म्हटले आहे. या हॅकर्सनी अमेरिका, इस्रायलची बंदरे, वीज प्रकल्प आणि जलशुद्धीकरण केंद्रांसारख्या औद्योगिक क्षेत्रांमधील तांत्रिक कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये घुसखोरी केल्याचे समजते.
हॅकर गटाची दोन देशांना धमकी
‘हंदाला’ नावाच्या एका प्रमुख हॅकर गटाने युद्धविरामानंतर जाहीर केले की, ते अमेरिकेवरील हल्ले तात्पुरते स्थगित करत असले तरी इस्रायलला लक्ष्य करणे सुरूच ठेवतील. योग्य वेळ आल्यास अमेरिकेच्या विरोधात पुन्हा सक्रिय होऊ, असेही या गटाने म्हटले आहे. सध्याचा दोन आठवड्यांचा युद्धविराम आधीच दोन्ही पक्षांमधील मतभेदांमुळे कमकुवत होताना दिसत आहे, कारण दोघेही विजयाचा दावा करत आहेत.
हॅकर कोणावर हल्ला करतात?
पॅलेस्टाइन- इराण समर्थक ‘हंदाला’ नेटवर्कने अनेक मोठ्या सायबर हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. यामध्ये प्रमुख अमेरिकन वैद्यकीय उपकरण निर्माती कंपनी ‘स्ट्राइकर’च्या कामकाजात अडथळा आणणे आणि एफबीआय संचालक काश पटेल यांच्या खासगी ई-मेल खात्यात घुसखोरी करणे यांचा प्रमुख समावेश आहे. हा समूह इराणशी संबंधित अनेक ‘प्रॉक्सी’ हॅकर नेटवर्क्सपैकी एक आहे.
पॅलेस्टिनी संघर्षाचे प्रतीक
‘हंदाला’ हे १० वर्षांच्या लहान मुलाचे कार्टून पात्र असून ते नाजी अल-अली यांनी १९६९ मध्ये चित्रित केले. हा अनवाणी, फाटके कपडे घातलेला पाठमोरा मुलगा. त्याची पाठ म्हणजे अन्यायाचा निषेधाची भूमिका दर्शवते. त्याचे वय पॅलेस्टाइन स्थलांतरितांच्या काळाशी जोडलेले आहे. पॅलेस्टिनींच्या विस्थापन, दु:ख व ओळख जपण्याच्या संघर्षाचे ते प्रतीक आहे. आजही ते स्वातंत्र्याच्या लढ्याचे चिन्ह मानला जाते.
हॅकर्सची ओळख
- या गटाची ओळख : ‘हंदाला हॅक’ हा स्वतंत्र गट नसून ‘व्हॉइड मँटिकोर’ नावाच्या सायबर गटाचा भाग आहे. हा गट इराणच्या गुप्तचर संस्थाशी संबंधित मानला जातो.
- या गटाची इतर नावे : रेड स्टँडस्ट्रॉम, बॅनिश्ड किटन, कर्मा, होमलँड जस्टीस.
- जन्म : ‘हंदाला’ हा गट २०२३ पासून सक्रिय, याचे नाव पॅलेस्टाइन प्रतीक ‘हंदाला’वरून घेतले आहे.
- यांची लक्ष्ये : मुख्यतः इस्रायलमधील संस्था, पश्चिम आशियातील देश, अमेरिकी कंपन्या.
- हल्ल्याची ठिकाणे : सरकारी संस्था, टेलिकॉम नेटवर्क, औद्योगिक व महत्त्वाच्या पायाभूत सुविधा
- हल्ल्यांची पद्धत : हॅक करणे आणि लिक तंत्र म्हणजे सिस्टीम हॅक करून डेटा चोरणे आणि तो सार्वजनिक करणे.
- वायवर अटॅक्स : डेटा पूर्णपणे नष्ट करणे, सिस्टीम पूर्ण निकामी करणे.
- मानसशास्त्रीय युद्ध : माहिती फोडून करून भीती निर्माण करणे, सार्वजनिक प्रतिमा आणि विश्वास डळमळीत करणे.