गुगलमुळे नेत्याला सोडावे लागले राजकारण, आता द्यावी लागणार 4 कोटींची नुकसान भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 12:12 PM2022-06-06T12:12:52+5:302022-06-06T13:01:45+5:30
Google-YouTube: 2020 मध्ये YouTuberवर एका नेत्याच्या विरोधात दोन चुकीचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते.
Google-YouTube: आक्षेपार्ह व्हिडीओमुळे गुगलने अनेकदा युजर्सला दंड ठोठावल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण, एक वादग्रस्त व्हिडीओ काढून टाकण्यात अयशस्वी ठरल्याने ऑस्ट्रेलियातील न्यायालयाने गुगललाच 4 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, न्यायालयाने म्हटले की, यूट्यूबवरील बदनामीकारक व्हिडिओ डिलीट न केल्यामुळे माजी खासदाराला मुदतीपूर्वीच राजकारण सोडावे लागले. यासाठी, गुगल आता त्या माजी खासदाराला 715,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (US$515,000) ची भरपाई देईल. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत 3 कोटी 99 लाख 95 हजार 183 रुपये आहे.
लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला
फेडरल कोर्टाला आढळले की, कंटेंट-शेअरिंग वेबसाइट YouTube ची मालक कंपनी अल्फाबेट इंकने, न्यू साउथ वेल्सच्या तत्कालीन उप-प्रीमियरवर हल्ला करणारे दोन व्हिडिओ प्रसारित करून पैसे कमवले. 2020 मध्ये पोस्ट केल्यापासून ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्समध्ये सुमारे 800,000 लोकांनी ते व्हिडिओ पाहिले.
नेत्याला राजकारण सोडावे लागले
न्यायाधीश स्टीव्ह रेयर्स म्हणाले की, राजकीय समालोचक जॉर्डन शँक्सच्या व्हिडिओने जॉन बॅरिलारोच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ठोस पुराव्याशिवाय त्यांना भ्रष्ट घोषित करण्यात आले. त्यांच्यावर अपशब्दाचा वापर आणि वर्णद्वेषी टीकाही केली. गुगल आणि मिस्टर शँक्सच्या चुकीच्या प्रचारामुळे दुखावलेल्या जॉन बॅरिल्लारो यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये राजकारण सोडले. या संपूर्ण प्रकरणात गुगलची वागणूक चुकीची आणि अन्यायकारक होती. त्यामुळे त्याच्यावर हा दंड ठोठावण्यात आला आहे.