विदेशी कर्मचाऱ्यांसाठीच ‘गोल्ड कार्ड’ची सुवर्णसंधी; ८ कोटी रक्कम भरावी लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 08:13 IST2025-09-21T08:12:22+5:302025-09-21T08:13:02+5:30
या योजनेअंतर्गत विदेशी व्यक्तींना सुमारे ८.३ कोटी रुपये अमेरिकी सरकारला देणगी स्वरूपात द्यावे लागतील.

विदेशी कर्मचाऱ्यांसाठीच ‘गोल्ड कार्ड’ची सुवर्णसंधी; ८ कोटी रक्कम भरावी लागणार
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोल्ड कार्ड’ नावाने एक नवीन व्हिसा योजना जाहीर केली आहे. असामान्य कौशल्य असलेल्या विदेशी नागरिकांना अमेरिकेत येण्याचा वेगवान मार्ग उपलब्ध करून देणे हा योजनेचा उद्देश आहे.
असे आहे गोल्ड कार्डचे स्वरूप
या योजनेअंतर्गत विदेशी व्यक्तींना सुमारे ८.३ कोटी रुपये अमेरिकी सरकारला देणगी स्वरूपात द्यावे लागतील. जर एखादी कंपनी त्या व्यक्तीची प्रायोजक असेल तर १६.६ कोटी रुपये रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम भरल्यानंतर अर्जदारास त्वरित व्हिसा प्रक्रिया व ग्रीन कार्ड मिळविण्याचा मार्ग खुला होईल.
काय आहे गोल्ड कार्ड योजना
अर्जदाराला नॉन-रिफंडेबल प्रोसेसिंग फी भरावी लागेल.
अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर केल्यास व्हिसा प्रक्रिया सुरू केली जाईल.
अर्ज स्वीकारण्यात आल्यानंतर तर अर्जदाराने ८८ लाख रुपये भरणे आवश्यक आहे.
अर्जदार हा अमेरिकेचा कायदेशीर स्थायी निवासी होण्यास पात्र असावा.
तो अमेरिकेत येणार असल्यास त्यावेळी व्हिसा उपलब्ध असावा.
सरकारी तिजोरीत जमा झालेली रक्कम अमेरिकी उद्योग, व्यापारवाढीसाठी वापरली जाईल.
गोल्ड कार्ड विशेषतः यशस्वी उद्योजक, गुंतवणूकदार, आणि उद्योगपतींसाठी प्राधान्याने खुले आहे.
जाहीर केली तीन व्हिसा कार्ड
गोल्ड कार्ड
८.८ कोटी रुपये
फायदा : अमेरिकेत अमर्यादित रहिवासाचा अधिकार
नागरिकत्व मिळवण्यासाठी उपयुक्त
कॉर्पोरेट गोल्ड कार्ड
१७.६ कोटी रुपये
फायदा : कंपनी इतर कर्मचाऱ्याला व्हिसा ट्रान्सफर करू शकते
पुन्हा १७.६ कोटी रुपये भरण्याची गरज नाही
प्लॅटिनम कार्ड
४१.५ कोटी रुपये
फायदा : कर न भरता २७० दिवसांपर्यंत अमेरिकेत राहता येते, ट्रॅव्हल व्हिसाची गरज भासत नाही
हे फायदे
गोल्ड कार्डमधून अब्ज डॉलर्स अमेरिकेच्या तिजोरीत जमा होतील. या पैशाचा उपयोग कर्जाचा भार कमी करण्यासाठी होईल.