India-Pakistan: ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याकडून मोठा पराभव झाल्यानंतरही पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लष्करप्रमुख असीम मुनीरला बढती देऊन फील्ड मार्शल बनवले. तेव्हापासून मुनीर दररोज भारताविरुद्ध गरळ ओकत आहे. अशातच, सध्य पाकिस्तानात सत्तापालटाची चर्चा सुरू असताना, मुनीर म्हणतो की, ''खुदा'ने मला रक्षक बनवले आहे. मला कोणत्याची पदाची अपेक्षा नाही."
'शहीद होणे ही माझी इच्छा'पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर म्हणाला की, "माझी राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, मला फक्त स्वतःला देशाचा सेवक म्हणून राहायचे आहे. मी एक सैनिक आहे, माझी सर्वात मोठी इच्छा शहीद होणे आहे." 'जंग मीडिया ग्रुप'चे स्तंभलेखक सुहेल वारैच यांनी शनिवारी प्रकाशित झालेल्या एका लेखात दावा केला की, पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी अमेरिकेच्या दौऱ्यानंतर बेल्जियममध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयावर त्यांच्याशी वैयक्तिकरित्या चर्चा केली होती.
सत्तापालटाची अफवा पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीरचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानी सैन्य देशात सत्तापालट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मुनीरने अशा शक्यतांना स्पष्टपणे नाकारले. पाकिस्तानमध्ये नेतृत्व बदलाचे दावे नागरीक किंवा लष्करी एजन्सींनी केलेले नाहीत, तर देशातील राजकीय व्यवस्था अस्थिर करू इच्छिणाऱ्यांनी केलेले आहेत, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भारतावर टीका केली.