चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:53 IST2025-10-10T17:47:53+5:302025-10-10T17:53:39+5:30
US-China Trade War Shipping: अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेने चिनी जहाजांवर पोर्ट फी लादण्याच्या निर्णयानंतर चीननेही तत्काळ प्रत्युत्तर दिले. चीनच्या वाहतूक मंत्रालयाने अमेरिकेच्या मालकीच्या किंवा अमेरिकन कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व जहाजांवर अतिरिक्त बंदर शुल्क जाहीर केले. हे शुल्क मंगळवारपासून (१४ ऑक्टोबर) लागू होणार आहे.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, अमेरिकेने चिनी जहाजांवर शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे चीनने हा निर्णय घेतला. अमेरिकेत बांधलेल्या किंवा अमेरिकेचा ध्वज फडकवणाऱ्या सर्व जहाजांना चिनी बंदरांवर प्रत्येक वेळी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. अमेरिकेने चिनी जहाजांवर लादलेले शुल्क १४ ऑक्टोबरपासून लागू होतील.चिनी कंपन्यांच्या मालकीच्या जहाजांना अमेरिकेतील बंदरात येताना प्रत्येक वेळी प्रति टन $८० निश्चित शुल्क भरावे लागेल. १० हजारांपेक्षा जास्त कंटेनर वाहून नेणाऱ्या जहाजासाठी हे शुल्क १ दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचू शकते आणि २०२८ पर्यंत त्यात आणखी वाढ होईल.
चीन अमेरिकेच्या जहाजांवर किती शुल्क आकारणार?
तारीख | शुल्क (प्रति टन) | अंदाजित (डॉलर) |
१४ ऑक्टोबरपासून | ४०० युआन | ५६.१३ डॉलर |
१७ एप्रिल २०२६ पासून | ६४० युआन | ८९.८१ डॉलर |
१७ एप्रिल २०२८ पासून | १,१२० युआन | १५७.१६ डॉलर |
जागतिक व्यापारातील युद्ध
अमेरिकेने आपला देशांतर्गत जहाजबांधणी उद्योग पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि चीनची वाढती नौदल आणि व्यावसायिक शिपिंग शक्ती कमी करण्यासाठी हे शुल्क लादले आहे. गेल्या दोन दशकांत चीन हा जगातील नंबर वन जहाजबांधणी करणारा देश बनला आहे. लष्करी आणि उद्योग विश्लेषकांच्या मते, गेल्या वर्षी चिनी शिपयार्ड्सनी १ हजाराहून अधिक व्यावसायिक जहाजे बांधली. तर, अमेरिकेने १० पेक्षा कमी जहाजे बांधली.
सर्वाधिक नुकसान कोणाचे?
विश्लेषकांच्या मते, अमेरिकन जहाजांवर शुल्क आकारल्याने अमेरिकेचे कमी नुकसान होईल. कारण त्यांचा जहाजबांधणीचा उद्योग लहान आहे. याउलट, चिनी जहाजांवर शुल्क लादल्याने चीनचे जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण जागतिक शिपिंगमध्ये त्यांचा सहभाग मोठा आहे. अमेरिका आणि चीनच्या या नवीन 'पोर्ट फी' युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.