लहान मुलांना शिस्त लावण्यासाठी रागावणं, ओरडणं, मारणं ही भारतात सामान्य बाब असली तरी परदेशामध्ये लहान मुलांसोबत वागण्याचे कायदे अत्यंत कठोर आहेत. त्यामुळे तिथे लहान मुलांवर ओरडलं, रागावलं किंवा त्यांना मारलं तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ब्रिटनमध्ये नुकतीच अशी एक घटना ङडली आहे. येथे इतिहास विषयाची शिक्षिक असलेल्या आईने तिच्या मुलींकडून आयपॅड काढून त्यांना अभ्यास करायला सांगितल्याने तिची तुरुंगात रवानगी केल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पेशाने शिक्षिका असलेल्या वेनेसा ब्राऊन यांनी त्यांच्या मुलींना अभ्यासावर लक्ष देण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्याकडील आयपॅड काढून घेत तो स्वत:कडे ठेवला होता. या प्रकरणी पोलिसांनी वेनेसा ब्राऊन यांना चोर ठरवत त्यांची तुरुंगात रवानगी केली. तसेच त्यांना त्यांच्या मुलींना भेटूही दिलं नाही. एवढंच नाही तर या शिक्षिकेच्या वृद्ध आईसोबतही गुन्हेगारासारखं वर्तन केलं. वेनेसा ब्राऊन यांनी या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख नरकासारखा अनुभव असा केला आहे.
दरम्यान, वेनेसा ब्राऊन यांना सशर्त जामिनासह मुक्त करण्यात आलं आहे. जामिनाच्या अटींनुसार हे प्रकरण संपेपर्यंत ब्राऊन यांना या तपासाशी संबंधित कुठल्याही व्यक्तीशी बोलता येणार नाही. तर सरे पोलिसांनी सांगितले की, या दोन्ही डिव्हाईसचा शोध एका ४० वर्षीय व्यक्तीने दोन आयपॅड चोरीस गेल्याची तक्रार दिल्यानंतर सुरू झाला होता.
या अनुभवाबाबत ब्राऊन यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, याबाबत विचार केला तरी माझ्या अंगावर शहारे येतात. पोलिसांनी हे प्रकरण एवढं गंभीर नाही आहे याचा थोडाही विचार केला नाही. मी केवळ माझ्या मुलींकडील आयपॅड काढून घेतले होते आणि चहा पिण्यासाठी आईच्या घरी गेले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाला चोरीच्या गुन्ह्याचं रूप दिलं. मला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथे माझी झडती घेण्यात आली. हाताचे ठसे घेण्यात आले. तसेच तुरुंगात रवानगी करण्यात आली. तिथे मला सात तास ठेवण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.