Germany Coup Plot: जर्मनीत पुन्हा राजघराण्याची सत्ता आणण्याचा कट उधळला; राजकुमाराचा हात, २२ ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 13:18 IST2022-12-08T13:18:26+5:302022-12-08T13:18:44+5:30
अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक रशियन नागरीकही आहे. हेनरिकच्या राजघराण्याने अनेक दशके जर्मनीवर राज्य केले होते. त्याला तख्तापालट करून जर्मनीचा राजा व्हायचे होते.

Germany Coup Plot: जर्मनीत पुन्हा राजघराण्याची सत्ता आणण्याचा कट उधळला; राजकुमाराचा हात, २२ ताब्यात
बर्लिन: दुसऱ्या महायुद्धासाठी कारणीभूत ठरलेल्या जर्मनीमध्ये सरकार उलथवून लावत पुन्हा एकदा राजाची सत्ता आणण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले आहेत. जर्मनीच्या पोलिसांनी ३००० अधिकाऱ्यांच्या मदतीने देशभरात छापे टाकून २२ लोकांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या कट्टरपंथीयांमध्ये राजकुमार हेनरिक तृतीयचाही समावेश असल्याचे पोलीस सुत्रांनी म्हटले आहे.
जर्मनीच्या १६ राज्यांपैकी ११ राज्यांमधील १३० ठिकाणांवर छापा मारण्यात आला. जर्मनीचे कायदा मंत्री मार्को बुशमैन यांनी या छापेमारीला दहशतवाद विरोधी छापा असे म्हटले आहे. या संशयितांनी देशाच्या संस्थानांवर सशस्त्र हल्ल्याचा कट रचला होता.
तर वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यानुसार या लोकांनी जर्मनीचे सरकार हिंसक पद्धतीने उलथवून टाकण्याचा कट आणि षड्यंत्रकारक विचारांचे समर्थन केले होते. या ग्रुपच्या काही लोकांनी युद्धानंतर अस्तित्वात आलेल्या जर्मनीच्या संविधानाला स्वीकार करण्यास नकार दिला होता. सतेच सरकारला सत्तेबाहेर करण्याचे आवाहन लोकांना केले होते.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक रशियन नागरीकही आहे. वृत्तपत्र डेर स्पिगलनुसार या वृत्ताची सुरक्षा यंत्रणांनी पुष्टीही केलेली नाही आणि नाकारलेलेही नाही. काही लोक संसदेवर हल्ला करण्याचा कट रचत होते. बीबीसीनुसार त्यांनी डे एक्सची तयारी केली होती. राजघराणे हाउस ऑफ रीसकडून यावर अद्याप काही प्रतिक्रिया आलेली नाही.
राजघराण्याशी संबंधीत हेनरिक तिसरा याच्यावरही या कटात सहभागी असल्याचा आरोप होत आहे. हेनरिकच्या राजघराण्याने अनेक दशके जर्मनीवर राज्य केले होते. त्याला तख्तापालट करून जर्मनीचा राजा व्हायचे होते. तोच या संघटनेमागे असल्याचे सांगितले जात आहे. हेनरिक एक रिअल इस्टेट डेव्हलपर आहे. तो नेहमी लोकशाहीची तुलनेत राजेशाही कशी योग्य होती याचे समर्थन करत असतो. १९१८ मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या क्रांतीत राजेशाही संपुष्टात आली होती. हेनरिकने राजेशाहीत १० टक्केच कर होता आणि प्रशासनही पारदर्शक होते, असा दावा केला होता.