Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:29 IST2025-09-09T13:28:14+5:302025-09-09T13:29:23+5:30

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन जोरदार गोंधळ सुरू झाला आहे. शहरांमध्ये जाळपोळ सुरू आहे. आता मंत्र्यांच्या निवासस्थानांनाही लक्ष करण्यात येत आहे.

Gen-Z revolution leads to coup in Nepal? PM Oli in bid to flee to Dubai, private plane ready | Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार

Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनामुळे आता सत्तापालट होण्याची भीती निर्माण झाली आहे. नेपाळमध्ये Gen-Z यांच्या निषेधामुळे ओली सरकारसमोर मोठे संकट आले आहे. आतापर्यंत सरकारच्या गृह, कृषी आणि आरोग्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या या निषेधानंतर सरकारने संध्याकाळीच सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला असला, तरीही लोकांचा राग कमी झालेला नाही. अजूनही गोंधळ सुरूच आहे.

नेपाळचे पंतप्रधान ओली दुबईला जाण्याच्या प्रयत्नात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उपचाराच्या निमित्ताने ते दुबईला जाऊ शकतात. नेपाळच्या खाजगी हिमालय एअरलाइन्सला स्टँडबायवर ठेवण्यात आले आहेत. पंतप्रधान ओली कधीही देश सोडून जाऊ शकतात. ओली त्यांच्या जागी एका मंत्र्याला कार्यवाहक पंतप्रधान म्हणून नियुक्त करून दुबईला जाऊ शकतात. सध्या, Gen- Z निषेधाने क्रांतीचे रूप धारण केले आहे, त्यांचे लक्ष्य सरकारचे मंत्री आणि नेते आहेत. निदर्शक आता पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत आणि राजेशाही परत आणण्याची मागणी करत आहेत.

आतापर्यंत पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. नॅशनल इंडिपेंडेंट पार्टीचे २० हून अधिक खासदार एकत्रितपणे राजीनामा देत आहेत. विरोधी पक्षांनी नेपाळमध्ये संसद विसर्जित करून पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतरही सरकारविरोधी निदर्शने सुरूच आहेत. निदर्शकांनी अनेक मंत्र्यांच्या घरांना आग लावली आहे. गृहमंत्री रमेश लेखक यांच्या घराची तोडफोड करून आग लावण्यात आली आहे. कीर्तिपूर नगरपालिकेची इमारतही पेटवून देण्यात आली आहे.

राष्ट्रपतींच्या वैयक्तिक निवासस्थानावर कब्जा

नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नेते शेर बहादूर देऊबा यांच्या घराला निदर्शकांनी आग लावली. ओली यांच्या पक्षाचे नेते आणि माजी उपपंतप्रधान रघुवीर महासेठ यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. ललितपूरमधील सीपीएन माओवादी अध्यक्ष पुष्पकमल दहल यांच्या निवासस्थानावरही हल्ला करून आग लावण्यात आली. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या वैयक्तिक निवासस्थानावर कब्जा केला आहे.

Web Title: Gen-Z revolution leads to coup in Nepal? PM Oli in bid to flee to Dubai, private plane ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nepalनेपाळ