जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 05:25 IST2025-09-13T05:24:32+5:302025-09-13T05:25:39+5:30
Nepal Sushila Karki: माजी मुख्य न्यायमूर्ती सुशीला कार्की यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी जाहीर केले.

जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
काठमांडू : नेपाळमध्येपंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या अचानक राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेचा शेवट झाला. माजी मुख्य न्यायमूर्ती सुशीला कार्की यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी जाहीर केले. कार्की या नेपाळच्या पहिल्या हंगामी महिला पंतप्रधान बनल्या असून त्यांचा शपथविधी शुक्रवारी रात्री नऊ वाजता पार पडला.
सुशीला कार्की (वय ७३) या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती होत्या. त्यांची निर्भीड आणि प्रामाणिक न्यायमूर्ती म्हणून ख्याती होती. आता त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इतिहास रचणार आहेत.
राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या लष्करी अधिकारी, ‘जेन झी’ आंदोलनाचे प्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर कार्की यांची पंतप्रधानपदी निवड करण्याचा निर्णय घेतला. ही निवड सर्वपक्षीय सहमतीने झाली आहे. राष्ट्राध्यक्ष पौडेल यांचे प्रसारमाध्यम सल्लागार किरण पोखरेल यांनी ही माहिती दिली.
सुशीला कार्की यांच्यासमोरील आव्हाने
देशात कायदा आणि सुव्यवस्थेची घडी पुन्हा नीट बसविणे हे मुख्य आव्हान आहे. शपथविधीनंतर ते एक छोट्या आकाराचे मंत्रिमंडळ स्थापन करतील.
मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत संसद बरखास्त करण्याची शिफारस त्या राष्ट्राध्यक्षांना करण्याची शक्यता आहे.
नेपाळच्या पहिल्या हंगामी महिला पंतप्रधान कार्की.
एका भारतीयासह ५१ मृत्युमुखी
नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधात जेन झीच्या आंदोलनात आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला. त्यात एक भारतीय, तीन पोलिस कर्मचारी आणि नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. तसेच १,७०० जण जखमी झाले.
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर दगडफेक; आठ जण जखमी
काठमांडू : नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी एका भारतीय बसवर काठमांडूजवळ अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांनी बसवर तुफान दगडफेक केली, काचा फोडल्या.
भाविकांच्या बॅगा, रोख रक्कम, मोबाइल आदी गोष्टी लुटल्या. या हल्ल्यात आठ भाविक जखमी झाले. या प्रकाराची भारत सरकारने अतिशय गंभीर दखल घेतली आहे.
हे भाविक आंध्र प्रदेशमधून आले आहेत. ते प्रवास करत असलेल्या बसचा नोंदणी क्रमांक उत्तर प्रदेशमधील आहे. हे भाविक पशुपतीनाथ मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.