Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 17:56 IST2025-12-15T17:53:09+5:302025-12-15T17:56:57+5:30
China Wedding Ritual: चीनमध्ये राहणाऱ्या गेलाओ जमातीमध्ये लग्नाशी संबंधित एक विचित्र प्रथा पिढ्यानपिढ्या पाळली जात आहे.

Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
जगभरात विविध प्रकारच्या संस्कृती आणि त्यांच्या प्रथा पाहायला मिळतात. चीनमध्ये राहणाऱ्या गेलाओ जमातीमध्ये लग्नाशी संबंधित एक अशीच विचित्र प्रथा पिढ्यानपिढ्या पाळली जात आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, गेलाओ जमातीत लग्नापूर्वी वधूंना त्यांचे एक किंवा दोन दात जाणूनबुजून काढावे लागत असत. ही प्रथा वराच्या कुटुंबाचे रक्षण करते, असे मानले जाते.
लाओ लोक हे चीन आणि व्हिएतनाममध्ये राहणारे एक वांशिक गट आहेत. २०२१ मध्ये, चीनमध्ये त्यांची अंदाजे लोकसंख्या ६,७७,००० पेक्षा जास्त होती. ते प्रामुख्याने दक्षिण चीनमधील गुइझोउ प्रांताच्या पश्चिम भागात, गेलाओ काउंटीमध्ये राहतात. हे लोक शेतीवर अवलंबून आहेत, ज्यात तांदूळ हे त्यांचे मुख्य पीक आहे.
गेलाओ जमातीमध्ये, जेव्हा एखादी मुलगी सुमारे २० वर्षांची होते आणि तिच्या लग्नाची तयारी सुरू होते, तेव्हा हा विधी केला जातो. सर्वप्रथम, मुलीच्या मामांना आदराने घरी आमंत्रित केले जाते. त्यानंतर, एका लहान हातोड्याचा वापर करून, मामा वधूचे एक किंवा दोन वरचे पुढचे दात तोडतो. मुलीला मामा नसेल आईच्या नात्यातील दुसरा पुरुष नातेवाईक हा विधी करू शकतो. दात काढल्यानंतर, त्वरित बरे होण्यासाठी हिरड्यांवर एक विशेष औषधी पावडर लावली जाते. एखाद्या महिलेने दात काढण्याचा विधी पूर्ण केला नाही तर, तिला टीकेचा सामना करावा लागतो.
या विधीमागे अनेक लोककथा आणि समजुती आहेत. असे म्हटले जाते की, एक गेलाओ महिला तिच्या लग्नापूर्वी समाजासाठी फळे गोळा करताना कड्यावरून पडली. यात तिचे पुढचे दोन दात पडले. तिच्या शौर्याचा आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी, तिच्या या घटनेचे रूपांतर प्रथेमध्ये झाले. काही लोकांचा असा विश्वास आहे की, दात तसेच ठेवल्यास पतीच्या कुटुंबावर संकटाचा सामना करावा लागतो. तसेच मूल होण्यास अडचणी येतात. आजही अनेक भागात ही प्रथा पाळली जाते.