बदनामी ते मृत्यू... अंतर फक्त १००० दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 08:20 IST2025-03-01T08:20:07+5:302025-03-01T08:20:26+5:30

किम ही दक्षिण कोरियातील लोकप्रिय अभिनेत्री. २४ वर्षांच्या या अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या सेऊलमधील राहत्या घरात सापडला.

From infamy to death... the distance is only 1000 days. | बदनामी ते मृत्यू... अंतर फक्त १००० दिवस 

बदनामी ते मृत्यू... अंतर फक्त १००० दिवस 

बेताल झालेली समाजमाध्यमं आता माणसांच्या आयुष्याचा निकाल लावू लागली आहेत. त्यांच्या जगण्या-मरण्याचं कारण बनू लागली आहेत.  एका अपघातानंतर दक्षिण कोरियातील किम से रोम हिच्या आयुष्याचा ताबा माध्यमांनी घेतला, तेव्हाच तिला आपलं आता काही खरं नाही, हे समजून चुकलं होतं. काही दिवसांपूर्वी एका बातमीनं तिचं असं वाटणं किती खरं होतं हे सिद्ध केलं.

किम ही दक्षिण कोरियातील लोकप्रिय अभिनेत्री. २४ वर्षांच्या या अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या सेऊलमधील राहत्या घरात सापडला. ही आत्महत्या असल्याची बातमी आहे. लोकप्रियतेच्या शिखरावरून कोसळलेल्या किमला पुन्हा चित्रपटात काम करायचं होतं. पैसे कमवायचे होते, एक कॅफे सुरू करायचा होता, हे सगळं तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना माहिती होतं. ते तिचा करिअरमध्ये पुन्हा परतण्याचा संघर्ष पाहत होते. त्या सर्वांसाठी किमचा मृत्यू हा धक्का होता. बदनामीच्या वावटळीत आपली मैत्रीण तरून जाईल, असा विश्वास त्यांना वाटत होता. पण, माध्यमातील बदनामी, समाजाकडून होणारी चिखलफेक किमला सहन झाली नाही आणि म्हणूनच तिने आत्महत्या केली, असा आरोप किमच्या नातेवाइकांनी केला आहे.

किमने खूप लहान वयात चित्रपटात काम करायला सुरुवात केली.  २००९ मध्ये बालकलाकार म्हणून कोरियन चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलेल्या किमला  २०१० मध्ये ‘द मॅन फ्राम नो व्हेअर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी दक्षिण कोरियन फिल्म इंडस्ट्रीचा ‘बेस्ट न्यू ॲक्ट्रेस’ हा पुरस्कार मिळाला होता. मे २०२२ पर्यंत चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका करून किम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. 
पण १८ मे २०२२ मध्ये दारू पिऊन गाडी चालवताना तिच्याकडून अपघात झाला. तिची गाडी एका ट्रान्स्फाॅरर्मरवर धडकली. आजूबाजूच्या ६० दुकानांची वीज गेली. या अपघातानंतर तिने इन्स्टावर सलग अनेक पोस्ट लिहून माफी मागितली. न्यायालयाने तिला २०० मिलियन वोनचा म्हणजे १,३९,००० डाॅलर्सचा दंड ठोठावला. तोही तिने भरला. हा अपघात झाला, तेव्हा आपल्याला न्यायालय काय शिक्षा देईल, यापेक्षा माध्यमं आता आपलं काय करतील, याचीच चिंता जास्त होती. या अपघाताने माध्यमांनी तिचं वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणलं.  अनेक यूट्यूब चॅनल्सवर तिच्या वैयक्तिक आयुष्याचे अक्षरश: धिंडवडे काढले गेले.  

दक्षिण कोरियात विशेषत: महिला अभिनेत्रींकडून काही गुन्हा घडला, त्यात त्या दोषी ठरल्या, तर त्यांना पुन्हा चित्रपटात काम मिळणं अवघड होतं. माध्यमातून त्यांची जी बदनामी होते, त्यामुळे त्या हतबल होतात, आपलं मानसिक स्वास्थ्य गमावून बसतात.  अपघातानंतर किमच्या मृत्यूपर्यंत १००० दिवसांत माध्यमांनी अपघात आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यावर २००० पेक्षा जास्त बातम्या प्रसिद्ध केल्या.  त्यातल्या अनेक तथ्यहीन होत्या. तिला चित्रपटात काम मिळत नाहीये. पैसे मिळवण्यासाठी ती एका कॅफेमध्ये काम करतेय, झालेल्या प्रकाराबद्दल तिला जराही पस्तावा नसून, ती निर्लज्जपणे मित्र-मैत्रिणींसोबत पार्ट्या करत आहे, अशा एक ना अनेक बातम्या छापल्या गेल्या.
या सनसनाटी पत्रकारितेच्या विरोधातली चर्चा आता त्या देशात सुरू झाली आहे.

Web Title: From infamy to death... the distance is only 1000 days.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.