अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 19:47 IST2025-09-23T19:40:22+5:302025-09-23T19:47:36+5:30
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यासाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची गाडी रोखण्यात आली होती.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
New York Police Stopped French President Convoy: अमेरिकेत वाहतूक कोंडीमुळे एक विचित्र राजनैतिक घटना घडली ज्याची जगभरात चर्चा होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आलेल्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची कार पोलिसांनी रोखली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ताफा जात असल्याने पोलिसांनी मॅक्रॉन यांची वाट अडवली होती. त्यानंतर मॅक्रॉन रस्त्यावर उतरले आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांशी बोलू लागले. या घटनेचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मंगळवारी २३ सप्टेंबर अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची गाडी थांबवल्याने गोंधळ उडाला होता. मॅक्रॉन यांनी लगेचच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे फोनवरून तक्रार केली. या घटनेचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण दिल्यानंतर, मॅक्रॉन दिवसभराचे काम संपवून फ्रान्सच्या दूतावासात परतत असताना, ते ट्रॅफिक जाममध्ये अडकले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यासाठी रस्ता मोकळा केल्याने न्यू यॉर्क पोलिसांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांना अडवून ठेवलं होतं. ट्रम्प यांच्या ताफ्यामुळे सर्व रस्ते बंद झाले, ज्यामुळे मॅक्रॉन काही काळासाठी न्यू यॉर्कच्या रस्त्यांवर अडकले होते. पोलिसांच्या या कृतीमुळे मॅक्रॉन यांना दूतावासापर्यंत चालत जावे लागले.
ट्रॅफिकमध्ये अडकल्याने निराश होऊन मॅक्रॉन आपल्या गाडीतून उतरले आणि पोलिसांना रस्ता मोकळा करण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने मॅक्रॉन यांना, "माफ करा सक, सर्व काही बंद आहे," असं म्हटलं. जेव्हा पोलिसांनी त्यांना ट्रम्प यांचा गाडी येणार आहे सांगितले तेव्हा रस्त्यावर उभे राहून मॅक्रॉन यांनी विनोदाने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना फोन केला. न्यू यॉर्कमध्ये एका बॅरिकेडजवळ गर्दीसमोर उभे राहून मॅक्रॉन यांनी ट्रम्प यांना मार्ग मोकळा करण्यास सांगितले. "तुम्ही कसे आहात? तुम्हाला माहिती आहे का काय झाले? मी रस्त्यावर उभा आहे कारण तुमच्यासाठी सर्व काही बंद आहे," असं मॅक्रॉन ट्रम्प यांना म्हणाले.
अमेरिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हलक्याफुलक्या गप्पा झाल्या. या संभाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना रस्ता तात्काळ मोकळा करण्यास सांगितले. सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी केलेल्या मोठ्या घोषणेपूर्वी ही घटना घडली.