आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी; ब्रिटनमध्ये ७० कंपन्यांमध्ये ट्रायल सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 18:08 IST2022-06-09T18:08:10+5:302022-06-09T18:08:56+5:30
जगातील अनेक देश सध्या आठवड्यातील चार दिवस काम आणि तीन दिवसांच्या सुट्टीच्या फॉर्म्युलावर काम करत आहेत.

आठवड्यातून ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी; ब्रिटनमध्ये ७० कंपन्यांमध्ये ट्रायल सुरू!
नवी दिल्ली-
जगातील अनेक देश सध्या आठवड्यातील चार दिवस काम आणि तीन दिवसांच्या सुट्टीच्या फॉर्म्युलावर काम करत आहेत. यातच आता ब्रिटनमध्ये पूर्ण पगारासह आठवड्यातून केवळ चार दिवस काम आणि तीन दिवस काम करण्याच्या सिस्टमवर प्रायोगिक तत्वावर काम केलं जात आहे. यात विविध क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नवे नियम लागू करण्यात आले असून यानुसार डिसेंबरपर्यंत काम केलं जाईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी केलेले काम आणि त्याचे परिणाम याचं मूल्यमापन केलं जाणार आहे. जवळपास ७० हून अधिक कंपन्यांचा यात समावेश आहे. यात ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञ तसेच बोस्टन कॉलेज, यूएसएमधील तज्ज्ञांचा समावेश असेल.
चार दिवसीय आठवडा मोहिमेच्या एका निवेदनात म्हटलं आहे की ते संपूर्ण ब्रिटनस्थित आणि ३० हून अधिक क्षेत्रांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या ३,३०० हून अधिक कामगारांचे परिक्षण करतील. कर्मचाऱ्यांचं याआधीचं उत्पादन कायम ठेवून त्याबदल्यात कामाची वेळ कमी केली जाईल. तसंच पगार देखील पूर्ण दिला जाईल. week.4dayweek.co.uk नुसार, उत्पादकतेचं मोजमाप मोठ्या प्रमाणावर बिजनेस-टू-बिजनेसवर अवलंबून असतं.
जागतिक स्तरावर १५० हून अधिक कंपन्या चाचणीमध्ये सहभागी
जागतिक स्तरावर अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील ७ हजारहून अधिक कर्मचारी आणि १५० कंपन्यांनी ४-दिवसांच्या आठवड्यावर सहा महिन्यांच्या चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी करार केला आहे.