फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोझींना ५ वर्षे कारावास; पॅरिसच्या तुरुंगात रवानगी, पण कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 07:18 IST2025-10-22T07:18:04+5:302025-10-22T07:18:26+5:30
तुरुंगात प्रवेश करण्याआधी सार्कोझी हे आपल्या नातेवाइकांना भेटले.

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष सार्कोझींना ५ वर्षे कारावास; पॅरिसच्या तुरुंगात रवानगी, पण कारण काय?
पॅरिस : २००७च्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबियाकडून मिळालेल्य़ा निधीतून आपला प्रचार केल्याचा आरोप असलेले फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना सुनावलेल्या पाच वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेस मंगळवारपासून सुरुवात झाली. आधुनिक फ्रान्सच्या इतिहासात तुरुंगात जाणारे, शिक्षा भोगणारे ते पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
७० वर्षे वयाच्या सार्कोझी यांना पॅरिसच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. एका निर्दोष व्यक्तीला तुरुंगात डांबले जात आहे, असे सार्कोझी यांनी शिक्षा भोगण्यासाठी रवाना होण्याआधी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. २००७च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी लिबियाकडून पैसे घेतले. फ्रान्सच्या कायद्यान्वये हा फौजदारी गुन्हा आहे. सार्कोझी यांना दोषी ठरविले जाणे, न्यायाधीशांनी अपीलाच्या निर्णयाची वाट न पाहता, शिक्षा भोगण्यासाठी त्यांना तुरुंगात धाडण्याचा घेतलेला निर्णय या दोन्ही गोष्टींना त्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
तुरुंगात प्रवेश करण्याआधी सार्कोझी हे आपल्या नातेवाइकांना भेटले. त्यावेळी तिथे जमलेल्या शेकडो समर्थकांनी निकोलस, निकोलस अशा घोषणा दिल्या आणि फ्रान्सचे राष्ट्रगीत गायले.