चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:32 IST2025-09-29T12:30:04+5:302025-09-29T12:32:08+5:30
चीनचे माजी कृषी मंत्री तांग रेंजियान यांना लाचखोरीप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर ३८ मिलियन अमेरिकन डॉलर्सची लाच घेतल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्यांना आयुष्यभर राजकीय पदांवरून बंदी घालण्याचे आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
भारतात भ्रष्टाचारची मोठी चर्चा होत असते. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. त्याची चौकशी होते. पण, त्याचे पुढे काहीच होत नाही. चीनमधून भ्रष्टाचाराचे असेच एक प्रकरण समोर आले आहे. चीनचे माजी कृषी आणि ग्रामीण व्यवहार मंत्री तांग रेंजियान यांना लाचखोरीच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा दोन वर्षांत लागू केली जाणार आहे. माजी मंत्र्यांवर एकूण ३८ मिलियन अमेरिकन डॉलर्सची लाच घेतल्याचा आरोप होता.
चांगचुन लवाद पोलिस न्यायालयाने माजी मंत्री तांग यांना आजीवन राजकीय अपात्र ठरवण्याचा आणि त्यांच्या सर्व वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने त्यांच्या निकालात म्हटले आहे की, या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न राष्ट्रीय मदत निधीला दान केले जाणार आहे.
चीनच्या माजी मंत्र्यांवर हे आहेत आरोप
२००७ ते २०२४ दरम्यान माजी मंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या काळात त्यांनी व्यवसाय, प्रकल्प कंत्राट आणि नोकरीच्या ठिकाणी इतरांना मदत केली आणि त्या बदल्यात २६८ मिलियन युआन किमतीच्या भेटवस्तू मिळवल्या.
चीनचे माजी मंत्री तांग यांनी न्यायालयात आपले गुन्हे कबूल केले आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, त्यांच्या गुन्ह्यांमुळे राज्याचे आणि जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, माजी चिनी मंत्र्यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि बेकायदेशीर मालमत्ता परत केली. परिणामी, न्यायालयाने अंतिम निकालात त्यांना सूट दिली.
नेमकं प्रकरण काय?
न्यायालयाने २५ जुलै रोजी संपूर्ण खटल्याची सुनावणी केली. सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी, प्रतिवादींनी आणि त्यांच्या वकिलांनी सर्व पुरावे तपासले आणि त्यांचे युक्तिवाद सादर केले.
भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच
२०१२ मध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सत्तेवर आल्यानंतर चीनने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरू केली. या मोहिमेत अनेक लष्करी अधिकाऱ्यांसह १० लाखाहून अधिक अधिकाऱ्यांना शिक्षा झाली.