नवी दिल्ली- भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यामध्ये विविध महत्त्वाच्या विषायंवर चर्चा केली आहे. भारत आणि चीन यांच्यामध्ये डोकलामच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण झालेल्या परिस्थितीत गोखले यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गोखले यांची ही दुसरी भेट आहे. विजय गोखले यांनी भूतानचे परराष्ट्र सचिव डाशो सोनम त्शोंगो यांच्याबरोबर भूतानचे पंतप्रधान ल्योछेन त्शेरिंग तोबग्ये आणि राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांची काल भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यामधून दोन्ही देशातील मैत्री आणि सहकार्याचे संबंध अधिक दृढ होणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परराष्ट्र सचिव, लष्करप्रमुख बिपिन रावत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी भूतानला भेट दिली होती. या भेटींमध्ये या नेत्यांनी डोकलामसह विविध विषयांवर भूतानी नेत्यांशी चर्चा केली आहे.
गेल्या वर्षी १६ जूनपासून भारत आणि भूतान या दोन्ही देशांचे सैन्य सलग ७३ दिवस डोकलाममध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते. डोकलाम हा प्रदेश भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमावर्ती प्रदेशात आहे. चीनने तेथे रस्ताबांधणी सुरु केल्यावर भारताने त्यास आक्षेप घेतला. हा सर्व तणाव २८ ऑगस्ट रोजी निवळला. अजूनही दोन्ही देशांच्या दृष्टीने डोकलामचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा प्रदेश अत्यंत संवेदनशील बनलेला आहे.