Donald Trump Fake Video: पाकिस्तानातील अनेक भागात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्यांना महापुर आला आहे. उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली असून, भारताने पाकिस्तानाला खबरदारी घेण्याचा इशारा देत धरणांमधून पाणी सोडले. पण, याचबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात ते म्हणताना दिसत आहे की, पाकिस्तानात जो पूर आला आहे, तो भारताने धरणांमधून पाणी सोडल्यामुळे आला आहे. पण, मूळात डोनाल्ड ट्रम्प असं बोललेच नाहीत. मूळ व्हिडीओसोबत छेडछाड करून हा डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिडीओबद्दल पीआयबीने सविस्तर माहिती दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ डीपफेकचा प्रकार आहे. काश्मीरमधील धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प म्हणताना दिसत आहे, पण ते असे बोललेले नाहीत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही. मूळ व्हिडीओ ३० मे २५ रोजीचा आहे. अशा एआयच्या मदतीने बनवलेल्या व्हिडीओंपासून सावध रहा. गोंधळ आणि भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेले असतात. तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडीओ दिसले, तर आमच्याकडे तक्रार करा, असे पीआयबीने म्हटले आहे.
मूळ व्हिडीओ हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबल्यानंतरचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष मी थांबवला, असा दावा डोनाल्ड ट्रम्प मूळ व्हिडीओमध्ये करत आहेत.
पाकिस्तान पुरामुळे भयावह परिस्थिती
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाकिस्तानात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासातच ३० जणांचा मृत्यू झाला असून, १५ लोकांना घरंदार सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.
जवळपास २००० गावांना पुराचा फटका बसला असून, रिपोर्टनुसार पुरामुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांत पाकिस्तानमध्ये ८२० लोकांचा मृत्यू झाला आहे.