पाकमध्ये पूरस्थिती; मदत कार्यासाठी लष्कर तैनात
By Admin | Updated: September 11, 2014 23:45 IST2014-09-11T23:45:42+5:302014-09-11T23:45:42+5:30
देशात न भूतो पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानला बचाव आणि मदत कार्यासाठी गुरुवारी लष्कर तैनात करावे लागले. २६० नागरिकांचा बळी घेणाऱ्या या पुराचा लाखो लोकांना फटका बसला आहे.

पाकमध्ये पूरस्थिती; मदत कार्यासाठी लष्कर तैनात
इस्लामाबाद : देशात न भूतो पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानला बचाव आणि मदत कार्यासाठी गुरुवारी लष्कर तैनात करावे लागले. २६० नागरिकांचा बळी घेणाऱ्या या पुराचा लाखो लोकांना फटका बसला आहे.
पाकिस्तानची प्रमुख नदी असलेल्या चिनाबने देशाचा कृषिकणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब प्रांतात आधीच प्रचंड विध्वंस घडवून आणला असून, ही नदी अद्यापही दुथडी भरून वाहत आहे.
मुलकी प्रशासनाने पूरस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे सांगितल्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कर लोकांना वाचविण्यासाठी तसेच त्यांना अन्न व पाणी पुरविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करत आहे.
लष्कराने पाच सप्टेंबरपासून पंजाब व पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोहीम राबवून पुरामध्ये अडकून पडलेल्या २२ हजार लोकांना वाचविले. त्यांना नावा आणि हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले, असे लष्कराने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
पंजाबमध्ये दहा लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. नदीकाठाजवळील सखल भागात राहणाऱ्या दहा लाख लोकांना नावा, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. हा पूर पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात घातक पूर असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. पाकमध्ये पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत २६० नागरिकांचा बळी गेला आहे. (वृत्तसंस्था)