लेख: फिटनेस?- नव्हे, दातांमुळे ब्रिटिश सैनिकांवर गदा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 09:42 IST2025-09-01T09:40:57+5:302025-09-01T09:42:02+5:30

कधी नव्हे ते ब्रिटिश आर्मीचे सैनिक सध्या प्रचंड हादरले आहेत.

Fitness? - No, British soldiers were criticized for their teeth! | लेख: फिटनेस?- नव्हे, दातांमुळे ब्रिटिश सैनिकांवर गदा !

लेख: फिटनेस?- नव्हे, दातांमुळे ब्रिटिश सैनिकांवर गदा !

कधी नव्हे ते ब्रिटिश आर्मीचे सैनिक सध्या प्रचंड हादरले आहेत. भविष्याची चिंता त्यांना सतावते आहे. आपल्याला आर्मीतून केव्हा काढलं जाईल आणि कधी आपल्याला घरचा रस्ता धरावा लागेल, यामुळे ते प्रचंड चिंताक्रांत आहेत. याचा अर्थ ते पळपुटे आहेत, युद्धाला घाबरतात, सीमेवर जाऊन त्यांना लढाई करायची नाही, असं नाही. आपल्या बहादूरपणामुळे ब्रिटिश सैन्याचं आजही जगभरात नाव आहे.

मग ते असे घाबरलेत का? आपल्याला सैन्यातून काढून टाकलं जाईल, अशी भीती त्यांना का वाटते आहे? याचं कारण आहे ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ!’ सांगणार कुणाला ! दात घाण असल्यामुळे ब्रिटिश आर्मीमध्ये सैनिकांची नोकरी जात आहे किंवा अंतिम निवडीनंतरही त्यांना नाकारलं जात आहे. याशिवाय, तोंडावरील मुरूम आणि मानसिक आजारांमुळेही सैनिक नोकरी गमावत आहेत. ब्रिटिश आर्मीमध्ये भरती झालेल्या १७३ नवीन सैनिकांना त्यांच्या सडलेल्या व खराब दातांमुळे नुकताच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ब्रिटिश आर्मीचं म्हणणे आहे, जे स्वतःच्या दातांची देखभाल करू शकत नाहीत, ते सैनिकी मोहिमांची जबाबदारी कशी पार पाडणार? ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ४७,००० सैनिकांना वैद्यकीय कारणांमुळे निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आलं आहे. 

जूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, जवळपास २६,००० सैनिकांना सडलेले दात आणि हिरड्यांच्या आजारांवर उपचारांची गरज होती. नुकताच प्रसिद्ध झालेला एक अहवाल सांगतो, विविध ऑपरेशन्स आणि मोहिमांमध्ये तैनात प्रत्येक १,००० सैनिकांपैकी १५० सैनिकांना दंतचिकित्सेची गरज भासते. अफगाणिस्तानमध्ये, तसंच  इतर ठिकाणी असलेल्या अनेक ब्रिटिश सैनिकांना हेलिकॉप्टरद्वारे तत्काळ दंतचिकित्सेसाठी शिबिरात दाखल करण्यात आलं. युद्धामध्ये किंवा शत्रूनं केलेल्या हल्ल्यातच सैनिक जखमी होतात अथवा त्यांना अपंगत्वास सामोरं जावं लागतं असं नाही.

यासंदर्भात ब्रिटिश डेंटल असोसिएशनचं म्हणणं आहे, अफगाणिस्तान आणि इराकमधील युद्धांमध्ये जितक्या सैनिकांना अपंगत्व आलं त्यापेक्षा अधिक सैनिकांना दातांच्या समस्यांमुळे अपंगत्व आलं. २०२० ते २०२४ या कालावधीतील आकडेवारीनुसार, वैद्यकीय कारणांमुळे बाद करण्यात आलेल्या जवळपास अर्ध्या सैनिकांना मानसिक समस्या होत्या. या संभाव्य सैनिकांना हृदयविकार तसंच प्रजननासंबंधी अडचणी आणि तापामुळेही नकार देण्यात आला होता.

सैनिकांना भरतीमधून नाकारण्यात केवळ आरोग्य आणि दातांच्या समस्याच कारणीभूत नाहीत, तर चेहऱ्यावरील मुरुम आणि त्वचेच्या कारणांमुळेही अनेकांना सैनिक होण्यापासून मुकावं लागलं आहे. ब्रिटिश सैनिकी अधिकाऱ्यांच्या मते सुमारे दोन हजार सैनिकांना त्वचेच्या समस्यांमुळे सैन्यात घेण्यास नकार देण्यात आला. संरक्षण सचिव जॉन हीली यांनीदेखील मान्य केलं की सैनिकांची ही कमतरता भरून काढण्यासाठी वेळ लागेल.

सैनिकांची भरती करणाऱ्या कंपनी कॅपिटाचे रिचर्ड होलरॉयड सांगतात, ब्रिटिश सैनिकांच्या भरतीसंदर्भातले वैद्यकीय निकष इतके कठोर आहेत की इंग्लंडच्या रग्बी संघाच्या खेळाडूंनाही सैन्यात घेतलं जाणार नाही. त्यांनी सांगितलं, २०२३-२४ साठी दहा हजार सैनिकांच्या भरतीचं लक्ष्य ठेवलं होतं, पण आतापर्यंत फक्त ५,००० भरतीच होऊ शकल्या !

Web Title: Fitness? - No, British soldiers were criticized for their teeth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.