Italy Heist: दक्षिण इटलीतील पुगलिया येथे सोमवारी सकाळी एका हायवेवर चित्रपटालाही लाजवेल असा चोरीचा थरार पाहायला मिळाला. १० सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने फिल्मी स्टाईलने एक निमलष्करी धाड टाकत कॅश व्हॅन उडवून दिली. मात्र, एवढा मोठा राडा करूनही दरोडेखोरांच्या हाती एक रुपयाही लागला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास स्टेट रोड ६१३ या महामार्गावर ही घटना घडली. बॅटिस्टोली या कंपनीची रोकड घेऊन जाणारी एक चिलखती व्हॅन जात असताना ६ ते १० दरोडेखोरांनी तिचा रस्ता अडवला. काही दरोडेखोरांनी पोलिसांचा गणवेश घातला होता, तर काहींनी पांढरे ओव्हरऑल्स घातले होते.
वॉल ऑफ फ्लेम्स आणि भीषण स्फोट
वाहतूक रोखण्यासाठी दरोडेखोरांनी स्वतःची वाहने रस्त्याच्या मधोमध उभी केली आणि त्यांना आग लावून दिली. यामुळे महामार्गावर आगीचे मोठ्या ज्वाळा उठल्या होत्या, ज्यामुळे येणारी-जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या गोंधळाचा फायदा घेत दरोडेखोरांनी कॅश व्हॅनवर स्फोटके लावली. कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांनुसार, एका भीषण स्फोटात व्हॅनचा चक्काचूर झाला आणि परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले.
पोलिसांवर गोळीबार आणि थरारक पाठलाग
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, दरोडेखोरांनी पोलिसांवरही अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांच्या एका गाडीला तीन गोळ्या लागल्या, तर एका साध्या वेशातील गाडीला दरोडेखोरांनी धडक दिली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांना गाड्यांचा आडोसा घ्यावा लागला. सुदैवाने या संपूर्ण घटनेत पोलीस किंवा सामान्य नागरिक कोणीही जखमी झाले नाही.
एवढा राडा, पण हाती काहीच नाही!
इतका मोठा कट रचूनही दरोडेखोरांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कॅश व्हॅनमध्ये एक विशेष फोम-बेस्ड सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाली, ज्यामुळे रोकड सुरक्षित राहिली. स्फोट होऊनही दरोडेखोर पैसे काढू शकले नाहीत.
दरोडेखोरांची पळ काढण्याची पद्धत
पोलिसांची नाकेबंदी तोडण्यासाठी दरोडेखोरांनी महामार्गावर अडकलेल्या इतर चालकांच्या गाड्या जबरदस्तीने हिसकावून घेतल्या. त्यांनी पोलिसांच्या खिळ्यांच्या पट्ट्यांना चकवा देत पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून एका अल्फा रोमियोगाडीला पकडले आणि दोन संशयितांना ताब्यात घेतले. हे आरोपी फॉजिया परिसरातील असल्याचे समजते, जो भाग अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारांचा ओळखला जातो.
Web Summary : In Italy, armed robbers bombed a cash van on a highway, engaging in a shootout with police. Despite the dramatic heist, they escaped empty-handed due to a security system.
Web Summary : इटली में, सशस्त्र लुटेरों ने एक राजमार्ग पर एक कैश वैन पर बमबारी की और पुलिस के साथ मुठभेड़ की। नाटकीय डकैती के बावजूद, वे सुरक्षा प्रणाली के कारण खाली हाथ भाग गए।