बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 08:43 IST2025-12-21T08:43:12+5:302025-12-21T08:43:49+5:30
१२ डिसेंबरला ढाकाच्या बिजोयनगर परिसरात एका निवडणूक अभियानात मुखवटा घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी हादीच्या डोक्यात गोळी मारली होती.

बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
ढाका - बांगलादेशात अलीकडेच विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर आंदोलक भडकल्याने प्रचंड हिंसाचार सुरू आहे. त्यातच माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या हिंसक आंदोलनात जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळले. शनिवारी लक्ष्मीपूर येथे बीएनपी नेत्याच्या घराला बाहेरून बंद करत आग लावण्यात आली. ज्यात एका मुलीचा मृत्यू झाला आणि अन्य तिघे जखमी झाले आहेत.
सरकारला दिला होता २४ तासांचा अल्टिमेटम
१२ डिसेंबरला ढाकाच्या बिजोयनगर परिसरात एका निवडणूक अभियानात मुखवटा घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी हादीच्या डोक्यात गोळी मारली होती. गुरुवारी सिंगापूर येथे उपचारावेळी त्याचे निधन झाले. ३२ वर्षीय हादी याला शनिवारी ढाका विद्यापीठ मशिदीजवळील राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या समाधीजवळ कडक सुरक्षेत दफन करण्यात आले. हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात तोडफोड, जाळपोळ सुरू झाली आहे. ज्यात गुरुवारी चटोग्राम येथे भारतीय उच्चायुक्ताच्या निवासस्थानीही दगडफेक करण्यात आली. हादीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर इंकलाब पार्टीने अंतरिम सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम जारी करत हत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांना तातडीने अटक करा अशी मागणी केली होती.
शनिवारी दुपारनंतर ढाकाच्या शाहबाग चौकात हजारो लोकांची गर्दी जमली. त्यावेळी इंकलाबचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादीच्या अंत्ययात्रेतील नमाजानंतर हा इशारा दिला होता. शरीफ उस्मान हादी २०२४ च्या विद्रोहाचा प्रमुख चेहरा होता. भारताचा कट्टर विरोधक म्हणून त्याची ओळख होती. हादी याने नुकतीच ढाका मतदारसंघातून संसदीय निवडणूक लढवण्याची घोषणाही केली होती. आता हादीच्या मृत्यूने बांगलादेशात असंतोष पसरला आहे. त्याच्या कुटुंबाने शाहबाग येथे हादीचे स्मारक बनवण्याची मागणी केली आहे. जिथून त्याने बांगलादेशात सत्ता परिवर्तनाच्या आंदोलनाची सुरुवात केली होती. युनूस सरकारने हादीच्या मृत्यूनंतर एक दिवसीय राजकीय शोकची घोषणा केली.
दरम्यान, बांगलादेशात पसरलेल्या हिंसाचारानंतर नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्त कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी उच्चायुक्त आणि त्याच्या आसपासच्या परिसरात अतिरिक्त पोलीस तैनात केले आहेत. गुरुवारी रात्रीपासून ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शुक्रवारी आसपास बॅरिकेट्स लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.