FaceApp should be investigated by FBI says US senator Chuck Schumer | FaceAppची जगभरात धास्ती; अमेरिकेच्या खासदारांनाही वाटतेय भीती
FaceAppची जगभरात धास्ती; अमेरिकेच्या खासदारांनाही वाटतेय भीती

वॉशिंग्टन- जगभरातील अनेकांना सध्या फेसअ‍ॅपनं भुरळ घातली आहे. मात्र या अ‍ॅपमुळे माहितीची चोरी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच या अ‍ॅपचा तपास केला जावा, अशी मागणी अमेरिकेच्या एका वरिष्ठ खासदारानं सिनेटमध्ये केली. फेसअ‍ॅप प्रकरणाचा तपास एफबीआयनं करावा, या मागणीसाठी संबंधित खासदारानं संस्थेच्या प्रमुखांना पत्रदेखील लिहिलं. फेसअ‍ॅपच्या माध्यमातून रशिया माहिती गोळा करत असल्याचा संशय खासदारानं व्यक्त केला. 

अमेरिकन सिनेटचे सदस्य असलेल्या चक श्युमर यांनी एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर रे यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी फेसअ‍ॅपबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्त्याची माहिती चोरली जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. फेसअ‍ॅपचं मुख्यालय सेंट पीटर्सबर्गमध्ये असल्याचं त्यांनी एफबीआयच्या निदर्शनास आणून दिलं. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि कोट्यवधी अमेरिकन नागरिकांची माहिती धोक्यात असल्याचं श्युमर यांनी पत्रात नमूद केलं आहे. त्याआधी काल डेमोक्रेटिक नॅशनल कमिटीचे प्रमुख बॉब लॉर्ड यांनी फेसअ‍ॅप डिलीट करण्याचं आवाहन केलं. अमेरिकेत २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत डेमोक्रेटिक नॅशनल कमिटीला रशियन हॅकर्सचा फटका बसला होता. फेसअ‍ॅपची निर्मिती २०१७ मध्ये रशियन कंपनी वायरलेस लॅबनं केली. गेल्या काही दिवसांमध्ये या अ‍ॅपद्वारे तयार करण्यात आलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक चित्रपट कलाकारांनी, खेळाडूंनी या अ‍ॅपच्या माध्यमातून एडिट करण्यात आलेले फोटो शेअर केले आहेत. 


काय आहे फेस अ‍ॅप?
फेसअ‍ॅप हे आर्टिफिशियल (AI) इंटेलिजन्स अल्गोरिदमवर काम करतं. एआयच्या मदतीने युजर्सचा चेहरा कसा दिसेल हे सांगितलं जातं. ओल्ड फेस फिल्टर वापरल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या दाखवल्या जातात. म्हातारपणी लोक कसे दिसतील हे दाखवण्यासाठी न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो. ज्यामुळे युजर्सची प्रायव्हसी ही धोक्यात येऊ शकते. 


Web Title: FaceApp should be investigated by FBI says US senator Chuck Schumer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.