अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांची हकालपट्टी टळणार
By Admin | Updated: November 22, 2014 02:42 IST2014-11-22T02:42:19+5:302014-11-22T02:42:19+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेसला बाजूस सारत मोठ्या स्थलांतर सुधारणांची घोषणा केली.

अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांची हकालपट्टी टळणार
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेसला बाजूस सारत मोठ्या स्थलांतर सुधारणांची घोषणा केली. या सुधारणांमुळे अमेरिकेतील ५० लाख बेकायदा नागरिकांना हकालपट्टीपासून संरक्षण मिळणार आहे, त्यात ४ लाख ५० हजार भारतीय नागरिकही आहेत, तसेच ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या हजारो भारतीय तंत्रज्ञांनाही दिलासा मिळणार आहे.
आज आमची स्थलांतर व्यवस्था मोडकळीस आली आहे, प्रत्येकाला हे माहीत आहे, त्यात सुधारणा व्हाव्यात अशी गेल्या कित्येक दशकातील इच्छा होती; पण त्याबाबत काही फारसे केले गेले नाही. बेकायदेशीर नागरिकांना हा मोफत पास असल्याची टीका विरोधक करीत आहेत, ती ओबामा यांनी फेटाळली असून, यापुढे सीमा सुरक्षा अत्यंत कडक केली जाईल. बेकायदेशीर प्रवेश रोखला जाईल. अमेरिकेच्या अध्यक्षांनी लागू केलेली ही सर्वात मोठी स्थलांतर सुधारणा आहे असे बोलले जात आहे. या सुधारणानुसार एलपीआर मिळाल्यानंतर व्हिसाची वाट पाहणाऱ्या कुशल तंत्रज्ञ व त्यांच्या जोडीदारासाठी काम करण्याचे सोपे नियम लागू केले जातील. सध्याच्या नियमानुसार एलपीआर अर्ज मंजूर झाल्यानंतर व्हिसा मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहणाऱ्यांना व्हिसा दिला जाईल, तसेच यापुढे बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांना तात्काळ परत पाठविले जाईल. कुशल स्थलांतरितांना, पदवीधरांना व उद्योजकांना लवकर व सहज व्हिसा मिळेल, असे पाहिले जाईल. या लोकांचे योगदान अर्थव्यवस्थेला मिळेल व देशाला व्यापारी नेते मिळतील, असे ओबामांनी म्हटले आहे; पण देशात आत्ता राहत असलेल्या बेकायदेशीर लोकांची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही उपाय योजू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)