चीनमध्ये गोदामात स्फोट; ५० ठार
By Admin | Updated: August 13, 2015 22:35 IST2015-08-13T22:35:33+5:302015-08-13T22:35:33+5:30
चीनच्या तियानजीन शहरात रासायनिक आणि इतर धोकादायक पदार्थांच्या गोदामात झालेल्या भयंकर स्फोटात ५० ठार, तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले

चीनमध्ये गोदामात स्फोट; ५० ठार
तियानजीन : चीनच्या तियानजीन शहरात रासायनिक आणि इतर धोकादायक पदार्थांच्या गोदामात झालेल्या भयंकर स्फोटात ५० ठार, तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले. २१ जण बेपत्ता असून ५२ जणांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटातून उठलेल्या अग्निगोळ्यांनी रात्रीचे आकाश उजळून टाकत स्फोटासह आकाशात फेकल्या गेलेल्या अवशेषांचा वर्षाव केला.
हे दुहेरी स्फोट स्थानिक वेळेनुसार बुधवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी झाले. स्फोटापूर्वी गोदामाला आग लागली होती व ती अर्धा तास धुमसत होती. स्फोटांमुळे उठलेल्या अग्निगोळ्यांनी नजीकच्या कंपन्यांतही स्फोट घडवून आणले, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
नजीकच्या परिसरातील दहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. आग नियंत्रणात आल्याचे प्रशासन सांगत असले तरी अग्निशमन कर्मचारी शुष्क पावडर व वाळू टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते.
रासायनिक घटकांमुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याऐवजी वाळू आणि इतर घटकांचा वापर करावा लागत आहे, असे सरकारी सीसीटीव्हीने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)