पगार रोखून 2.76 कोटी लोकांचे शोषण; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 15:01 IST2024-03-22T14:58:03+5:302024-03-22T15:01:52+5:30
२०१६ ते २०२१ या काळात अशा लोकांची संख्या २७ लाखांनी वाढली.

पगार रोखून 2.76 कोटी लोकांचे शोषण; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (आयएलओ) ताज्या अहवालानुसार, २०२१ मध्ये जगभरातील २.७६ कोटी लोकांना कोणत्याही दिवशी बळजबरीने मजुरी करणे भाग पडले. हे प्रमाण जगातील १००० लोकांमागे ३.५ इतके आहे. २०१६ ते २०२१ या काळात अशा लोकांची संख्या २७ लाखांनी वाढली. तीन वर्षांपूर्वी असा फटका बसलेल्यांपैकी ८५ टक्के लोक खासगी उद्योग, सेवा आणि शेतीमध्ये सक्तीने मजूर म्हणून काम करत होते. सक्तीच्या श्रमातून दरवर्षी २३६ अब्ज डॉलरचा अवैध नफा होतो. २०१४ पासून अशा नफ्यात ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
प्रदेशानुसार सक्तीच्या मजुरीची टक्केवारी
- आशिया आणि प्रशांत महासागर क्षेत्र - ५५%
- युरोप आणि मध्य आशिया - १५%
- आफ्रिका - १४%
- अमेरिका - १३ टक्के
- अरब देश - ०३%
सक्तीचे काम कुठे?
- सेवा क्षेत्र - ३२%
- उद्योग - ३७%
- शेती - १२%
- देशांतर्गत काम - ८%
- इतर - ११%
कुठे सर्वाधिक सक्तीचे श्रम?
- २०२१ मध्ये आशिया आणि प्रशांत महासागर क्षेत्रात १.५ कोटी लोकांसह सक्तीच्या मजुरीमध्ये जगणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक होती.
- अहवालानुसार, यानंतर युरोप आणि मध्य आशिया येतो. सौदी अरेबिया आणि कतारमधील भारतीय कामगारांसह इतर कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले.
असे होते शोषण
- तीन वर्षांपूर्वी ६३ लाख लोक व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या परिस्थितीला सामोरे जात होते.
- या परिस्थितीत पकडलेल्या पाचपैकी जवळपास चारजण (७८ टक्के) मुली किंवा महिला होत्या.
- याशिवाय नोकरीवरून काढून टाकण्याची भीती निर्माण करून शोषणही केले जाते.