पृथ्वीलाही होते शनीसारखे कडे! छुप्या खड्ड्यांनी उलगडले रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 06:18 IST2024-09-17T06:17:35+5:302024-09-17T06:18:52+5:30
अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स’ या नियकालिकात मागच्या आठवड्यात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. पृथ्वीलाही अशा प्रकारचे कडे ४६६ दशलक्ष वर्षांपूर्वी होते, असा दावा टॉमकिन्स यांनी यात केला आहे.

पृथ्वीलाही होते शनीसारखे कडे! छुप्या खड्ड्यांनी उलगडले रहस्य
सिडनी : शनी ग्रहाचे आकर्षक कडे कोणाला आकर्षित करत नाही बरे? या कड्यामुळेच शनीचे सर्व ग्रहांमध्ये वेगळे अस्तित्व आहे. आता ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठाचे भूगर्भशास्त्रज्ञ अँड्र्यू टॉमकिन्स आणि सहकाऱ्यांनी केलेल्या नव्या संशोधनातून पृथ्वीलाही शनीप्रमाणेच लाखो वर्षांपूर्वी कडे होते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स’ या नियकालिकात मागच्या आठवड्यात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. पृथ्वीलाही अशा प्रकारचे कडे ४६६ दशलक्ष वर्षांपूर्वी होते, असा दावा टॉमकिन्स यांनी यात केला आहे.
पृथ्वीवर छोटा तारा किंवा लघुग्रह आदळल्यामुळे कडे तुटून विषुववृत्ताजवळ २१ विशाल विवरे तयार झाली असावीत. लाखो वर्षे या लघुग्रहाचे भाग पडत राहिले असावेत, त्यातूनच विवरे, दलदलीचा भाग, त्सुनामी याची निर्मिती झाली असावी, असे संशोधनात म्हटले आहे.
असे तयार होते कडे...
एखादा छोटा तारा किंवा उपग्रह मोठ्या ग्रहाजवळून जातो, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे तो ताणला जातो. परंतु, ते मोठ्या ग्रहाच्या अगदी जवळ आले, तर त्याची शकले उडतात. असे तुकडे मग ग्रहाभोवती फिरत राहतात आणि कडे तयार होते.
कालांतराने हे तुकडे मोठ्या ग्रहावर पडतात आणि कडे नष्ट होऊ लागते. असाच प्रकार ४६६ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीच्या बाबतीत झाला.
त्यातूनच पृथ्वीवरील खंडांची रचना बदलली गेली. हे कडे विषुववृत्ताच्या वर असावे, त्यामुळे पृथ्वीचा आस सूर्यकक्षेच्या बाजूने झुकलेला दिसतो.