युरोपचे शेवटचे हुकूमशहा! व्लादिमीर पुतिन यांचे मित्र...कोण आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:53 IST2025-03-26T16:53:13+5:302025-03-26T16:53:49+5:30
अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी काल(25 मार्च) सातव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे.

युरोपचे शेवटचे हुकूमशहा! व्लादिमीर पुतिन यांचे मित्र...कोण आहेत अलेक्झांडर लुकाशेन्को?
Belarus President : रशियाचेराष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे निकटवर्तीय आणि युरोपमधील शेवटचे हुकूमशहा म्हणून ओळखले जाणारे अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी मंगळवारी (25 मार्च) पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. लुकाशेन्को यांनी सातव्यांदा बेलारुस देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी हुकूमशाह म्हणणाऱ्या, विशेषतः पाश्चात्य देशांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, "बेलारुसमध्ये त्या देशांपेक्षा अधिक लोकशाही आहे."
तीन दशकांपासून सत्तेत...
बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी अलीकडेच सत्तेत तीन दशके पूर्ण केली आहेत. त्यांनी 26 जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकांचे वर्णन त्यांच्या राजकीय विरोधकांसाठी शोडाउन म्हणून केले आहे. बेलारुसच्या निवडणूक आयोगाने सांगितल्यानुसार, लुकाशेन्को यांनी सुमारे 87 टक्के मतांनी निवडणूक जिंकली आहे. महत्वाची बाब म्हणजे, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत लुकाशेन्को यांच्यासमोर चार प्रतीकात्मक उमेदवार उभे होते. ते लुकाशेन्को यांचे एकनिष्ठ मानले जातात. यावरुनच समजते की, बेलारुसमध्ये फक्त नावालाच निवडणूक झाली आहे.
WATCH: Alexander Lukashenko, a close ally of Russia’s Vladimir Putin, was sworn in as president of Belarus for the seventh time pic.twitter.com/JqbFgy0GmZ
— Reuters Asia (@ReutersAsia) March 25, 2025
2020 मध्ये बेलारुसमध्ये अघोषित आणीबाणी ?
2020 मध्ये अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली, तेव्हा सुमारे 90 लाख लोकांनी अनेक महिने मोठ्या प्रमाणावर निषेध केला, परंतु हा निषेध क्रूरपणे दडपण्यात आला. सरकारने जवळपास सर्वच विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले आहे किंवा ते परदेशात वनवासात जीवन जगत आहेत. निदर्शनांनंतर 65 हजारांहून अधिक लोकांना अटक करण्यात आली. हजारो लोकांना पोलिसांनी मारहाण केली. याशिवाय स्वतंत्र मीडिया आऊटलेट्स आणि एनजीओ देखील बंद करण्यात आले होते. या अघोषित आणीबाणीमुळे लुकाशेन्कोवर पाश्चात्य देशांनी खूप टीका केली आणि बेलारुसवरही अनेक निर्बंध लादले होते.