युरो चषक - अंतिम सामन्याआधी फ्रेंच समर्थकांचा हिंसाचार, ४० जणांना अटक
By Admin | Updated: July 11, 2016 09:06 IST2016-07-11T09:00:13+5:302016-07-11T09:06:01+5:30
युरो चषकातील पोर्तुगाल विरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर हिंसाचार आणि अन्य गुन्ह्यांप्रकरणी फ्रेंच पोलिसांनी ४० जणांना अटक केली आहे.

युरो चषक - अंतिम सामन्याआधी फ्रेंच समर्थकांचा हिंसाचार, ४० जणांना अटक
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. ११ - युरो चषकातील पोर्तुगाल विरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर हिंसाचार आणि अन्य गुन्ह्यांप्रकरणी फ्रेंच पोलिसांनी ४० जणांना अटक केली आहे. आयफेल टॉवरजवळ फॅन झोनमध्ये फ्रेंच समर्थकांना प्रवेश नाकारल्यानंतर काही जणांनी पोलिसांवर बाटल्या फेकल्या. रस्त्यावर आग लावली.
९० हजार क्षमतेचे फॅन झोन पूर्ण भरल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला असे पॅरिस पोलिसांनी सांगितले. अंतिम सामना झाला त्या स्टेड डी फ्रान्स स्टेडियमच्या बाहेरुन काहीजणांना अटक करण्यात आली. स्टेडियमबाहेर हिंसाचारा केल्या प्रकरणी त्यांना अटक झाली.
आयफेल टॉवरजवळ पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या. यापूर्वी ११ जूनला रशिया-इंग्लंड सामन्याच्यावेळी हिंसाचार झाला होता. त्यात ३५ जण जखमी झाले होते. पूर्ण तयारीत आलेल्या रशियन समर्थकांनी त्यावेळी इंग्लंड समर्थकांवर हल्ला केला होता.