UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 21:42 IST2025-11-24T21:42:13+5:302025-11-24T21:42:55+5:30
या ज्वालामुखीच्या स्फोटाने या भागात एकच खळबळ उडाली आहे...

UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
इथिओपियातील अफार प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेली सुमारे १०००० वर्षे पूर्णपणे शांत असलेला हेली गुब्बी (Hal Gubbi) ढाल ज्वालामुखी (Shield Volcano) रविवारी अचानक सक्रिय झाला. या ज्वालामुखीच्या स्फोटाने या भागात एकच खळबळ उडाली आहे.
'खलीज टाइम्स'च्या वृत्तानुसार, इतिहासाचा विचार करता, या ज्वालामुखीचा प्रथमच एवढ्या तीव्रतेने उद्रेक झाला आहे. याच्या स्फोटातून निघालेली राख आणि सल्फर डायऑक्साइडचे विशाल ढग आकाशात १५ किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले. हे ढग आता लाल समुद्राला पार करून पूर्वेला येमेन आणि ओमानच्या दिशेने पसरत असल्याची माहिती टूलूज ज्वालामुखी राख सल्लागार केंद्राने (VAAC) उपग्रह प्रतिमांच्या आधारे दिली आहे.
या ज्वालामुखीच्या राखेमुळे आणि वायूमुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. विमानांच्या इंजिनांसाठी ही राख अत्यंत धोकादायक असल्याने, अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यातच, इंडिगोची कन्नूरहून अबू धाबीला जाणारे विमान 6E 1433 सुरक्षितता म्हणून अहमदाबाद विमानतळाकडे वळवण्यात आले.
हा स्फोट बंजर दानाकिल डिप्रेशनमध्ये झाला, हा भाग जगातील सर्वात दुर्गम भागांपैकी एक आहे. या भागात कोणतीही ग्राउंड मॉनिटरिंग सिस्टम नसल्याने, स्फोटाची पुष्टी आणि पुढील निरीक्षणाचे काम संपूर्णपणे उपग्रह डेटावर अवलंबून आहे.
वैज्ञानिक दृष्टीने ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात असली तरी, अफार क्षेत्रातील तीव्र उष्णता आणि अतिशय दुर्गम असलेल्या भागामुळे अद्याप भूगर्भशास्त्रज्ञांची पथके घटनास्थळी पोहोचू शकलेली नाहीत. अरब द्वीपकल्पाच्या काही भागांत सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्याने हवेच्या गुणवत्तेबद्दल (Air Quality) सूचना जारी करून नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. सध्या, उपग्रहांद्वारे ज्वालामुखीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.