एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 07:03 IST2025-12-21T07:02:58+5:302025-12-21T07:03:12+5:30
फाइल्समधून नवी माहिती उघड नाही; ट्रम्प यांचा पत्नी मेलिनी सोबतचा फोटो प्रसिद्ध

एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
न्यूयॉर्क : लैंगिक तस्करी प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' व भारताच्या आयुर्वेदाचे संदर्भ आढळले आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेल्या फाइलपैकी एकात 'विषहरण' (डिटॉक्सिकेशन) करण्यासाठी मालिश व आयुर्वेदाच्या वापराचा उल्लेख आहे. जारी फाइलमध्ये पाच हजार वर्षे जुन्या भारतीय चिकित्सेत मालिश व अन्य काही उपचार सांगितले असून उपचार पाश्चात्य देशात घेतले जातात. तसेच 'द आर्ट ऑफ गिव्हिंग मसाज' या शीर्षकाचे लेख आहेत. यात शरीरामधील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करण्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
एपस्टीन फाइल्समधून काहीच सनसनाटी माहिती बाहेर न पडल्याने अमेरिकेत दोन राजकीय गट पडले आहेत. काँग्रेसने मुदत दिली होती, पण ती न्याय विभागाला पाळता आली नाही. केवळ डेमोक्रॅट्स नेत्यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले, ट्रम्प यांचे नाही, अशीही टीका डेमोक्रॅटिक यांनी केली. तर रिपब्लिकन पक्षाने क्लिंटन यांचा हॉट टबमधील फोटो शेअर केल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने पारदर्शकता पाळली असा दावा केला.
एका बाथ टबमध्ये अंघोळ
माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी एपस्टीन सोबत केलेल्या प्रवासाचे काही जुने फोटो आहेत. तसेच ते एका बाथ टबमध्ये अंघोळ करताना दिसत आहेत. या दोघांव्यतिरिक्त अँड्र्यू मॉउंटबॅटन विंडसर, संगीतकार मिक जॅगर, मायकेल जॅक्सन यांचे फोटो आहेत. पण, या सर्व फोटोंमध्ये कोणीही गैरकृत्य करताना दिसत नाहीत. ट्रम्पही त्यांच्या पत्नीसोबत एका पार्टीत उपस्थित आहेत.