पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 05:47 IST2025-07-26T05:46:57+5:302025-07-26T05:47:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मालदीवमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
माले : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मालदीवमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी मालदीवला ४,८५० कोटी रुपयांची कर्ज सुविधा देण्याची घोषणा करून बेटांचा समूह असलेले हे राष्ट्र सर्वात विश्वासू मित्र असल्याचा भारताला अभिमान असल्याचे नमूद केले. मालदीवची संरक्षण क्षमता अधिक भक्कम व्हावी यासाठी भारत सातत्याने समर्थन देईल, असे मोदींनी म्हटले.
विद्यार्थ्यांनी केले स्वागत
सकाळी मोदी माले येथे दाखल झाल्यावर त्यांचे अत्यंत उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. स्वत: मुईज्जू आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी मोदी यांचे वेलेना विमानतळावर स्वागत केले. यानंतर रिपब्लिक स्वेअरवर त्यांचे औपचारिक स्वागत करून सलामी देण्यात आली.
चीनच्या प्रभावातून बाहेर काढण्याचे प्रयत्न
भारत आऊट’ मोहिमेच्या प्रचारानंतर सत्तेत आलेले मुईज्जू यांनी नंतरच्या काळात आपल्या देशातून भारतीय सैनिकांना परत बोलावण्याचे आवाहन केले होते. आता मालदीवची चीनशी वाढलेली सलगी पाहता या प्रभावातून बाहेर काढून नवे संबंध तयार करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
मैत्री नवी उंची गाठेल
मोदींनी स्वागताबद्दल आनंद व्यक्त करत दोन्ही देशांतील मैत्री नवी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला. संबंधांत सुधारणा दोन्ही देशांतील परस्पर संबंधांत झालेल्या सुधारणांबद्दल परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी हा सकारात्मक विचारांचा परिणाम असल्याचे सांगितले.