सकाळीच एलन मस्क यांनी अमेरिके डोनाल्ड ट्रम्प यांच्या वन बिग, ब्युटीफुल बिलवर ट्रम्प हरणार अशी टीका केली होती. यावर आता ट्रम्प यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या १२ तासांपासून अमेरिकन संसदेत मॅरेथ़ॉन मतदान सुरु आहे. मस्क यांनी तर ट्रम्प याच्या या महत्वाकांक्षी विधेयकाला हाणून पाडण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. अशातच ट्रम्प यांनी मस्कना सर्व गुंडाळून आफ्रिकेला परत जावे लागणार असल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली आहे.
मला राष्ट्राध्यक्ष बनविण्यासाठी मस्क यांनी मदत केली होती, त्यापूर्वीच त्यांना मी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्याविरोधात आहे हे माहिती होते. इलेक्ट्रीक कारबाबत जर बोलायचे झाले तर त्या ठीक आहेत, परंतू प्रत्येकाला ती खरेदी करण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. मानवी इतिहासात कोणाला मिळाली नसेल एवढी सबसिडी मस्क यांना मिळाली होती. परंतू, आता सबसिडीविना कदाचित मस्क यांना आपले दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावे लागणार आहे. नाही जास्त रॉकेट लाँचर उडणार, नाही सॅटेलाईट किंवा इलेक्ट्रीक कारचे उत्पादन होणार, यामुळे आम्ही खूप सारे पैसे वाचवू शकू, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. तसेच डॉजने मस्कला मिळालेल्या सरकारी अनुदानांची आणि करारांची चौकशी करावी आणि त्यात कपात करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांचे हे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये मंजूर झाले तर मस्क यांनी आपण नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे म्हटले आहे. मस्क मूळचे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग आफ्रिकेत घालवला. १९८९ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतून कॅनडाला गेले आणि नंतर कॅनडाहून अमेरिकेत आले. त्यांची आई कॅनडाची असल्याने त्यांना अमेरिकेत स्थायिक होण्यास मोठी मदत मिळाली. त्यासाठीही त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. ट्रम्प यांच्याशी बिनसल्यानंतर अमेरिकेचे आजी-माजी राजकारणी, अधिकारी मस्क यांच्या अमेरिकेच्या नागरिकत्वाची चौकशी करण्याचे आणि त्यांना डिपोर्ट करण्याची मागणी करत होते. आता ट्रम्प यांनी ते मनावर घेतले तर खरोखरच मस्क यांना आफ्रिका गाठावी लागण्याची शक्यता आहे.