Elon Musk Donald Trump White House America Government : प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री साऱ्यांनीच पाहिली आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीच्या दिवशी या दोघांनी एकत्रित डान्स करून आनंद साजरा केल्याचे साऱ्यांना अजूनही लक्षात आहे. पण आता मात्र ट्रम्प सरकार एलॉन मस्क यांना त्यांची 'जागा' दाखवत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मस्क यांच्याबद्दल असा दावा करण्यात येत होता की त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त अधिकार मिळाले आहेत. ते स्वतःच्या इच्छेनुसार हवा तो निर्णय घेऊ शकतात. इतकेच नव्हे तर ट्रम्प फक्त नामधारी प्रमु असून खरे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मस्क यांच्याकडेच आहे. या साऱ्या दाव्यांवर व्हाईट हाऊसने स्पष्टीकरण देत मस्क यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.
एलॉन मस्क केवळ सल्ला देऊ शकतात!
व्हाईट हाऊसने न्यायालयीन कागदपत्रात स्पष्ट केले आहे की, एलॉन मस्क यांना कोणतेही अधिकृत सरकारी निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हाऊसने पुढे म्हटले आहे की मस्क यांना औपचारिकपणे सरकारी निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. मस्क हे फक्त राष्ट्राध्यक्षांना सल्ला देऊ शकतात. व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ अँडमिनिस्ट्रेशनचे संचालक जोशुआ फिशर यांनी स्पष्ट केले आहे की, मस्क हे व्हाईट हाऊसचे कर्मचारी आहेत, परंतु ते Department of Government Efficiency (DOGE)चे अधिकृत कर्मचारी नाहीत. त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागाराची भूमिका देण्यात आली आहे, परंतु ते कोणतेही सरकारी धोरण ठरवून निर्णय घेऊ शकत नाहीत.
पुढे असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, व्हाईट हाऊसच्या इतर वरिष्ठ सल्लागारांप्रमाणे मस्क यांची भूमिका केवळ सल्ला देण्यापुरती मर्यादित आहे. मस्क फक्त राष्ट्राध्यक्षांना सल्ला देण्याचे काम करतात, परंतु त्यांना कोणत्याही सरकारी निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार नाही. मस्क यांचे काम व्हाईट हाऊसमधील एका विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित आहे.
प्रशासनात मस्क यांची भूमिका नाही
फिशर यांनी पुढे सांगितले की 'यूएस डॉज सर्व्हिस' ही राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकारी कार्यालयाचा एक भाग आहे. त्यांनी सांगितले की 'यूएस डॉज सर्व्हिस टेम्पररी ऑर्गनायझेशन' या सेवेअंतर्गत येते, परंतु ते व्हाईट हाऊस ऑफिसपासून पूर्णपणे वेगळे आहे. या विधानामुळे हे स्पष्ट झाले की मस्कची सरकारी प्रशासनात कोणतीही महत्त्वाची भूमिका नाही.