मोदी-जिनपिंग यांच्यात ५० मिनिटे चर्चा; दहशतवादाविरोधात सहकार्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 07:46 IST2025-09-01T07:44:39+5:302025-09-01T07:46:21+5:30
सुमारे सात वर्षांनंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली.

मोदी-जिनपिंग यांच्यात ५० मिनिटे चर्चा; दहशतवादाविरोधात सहकार्याची भूमिका
तिआंजिन: सुमारे सात वर्षांनंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली. यात मोदी यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला साथ द्यावी, असे आवाहन केले. दोन्ही देशांतील सहकार्यामुळे २.८ अब्ज लोकांना लाभ होऊन समस्त मानवतेच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होईल, असे मोदी म्हणाले. तर, जिनपिंग यांनी या भेटीबद्दल आनंद व्यक्त करून ड्रॅगन आणि हत्ती यांनी एकत्र यायला हवे, असे नमूद केले.
२०२० मध्ये गलवानमध्ये झालेल्या चीन-भारत संघर्षानंतरचा मोदी यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. दोन्ही देशांतील ताणले गेलेले संबंध सुरळीत करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
शत्रू नव्हे, विकास भागीदार
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारत-चीन हे प्रतिस्पर्धी नव्हे, तर विकासाचे भागीदार आहेत, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. सीमाप्रश्न सामोपचाराने सोडविण्याची कटिबद्धता व्यक्त करून जागतिक व्यापारात स्थैर्य आणण्याचा संकल्पही यावेळी केला.