बेली डान्सरवरून इजिप्त-इटलीत भांडण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 08:22 IST2025-07-19T08:22:01+5:302025-07-19T08:22:16+5:30

सोहिला तारेक हसन. प्रसिद्ध बेली डान्सर. विशेषत: इजिप्त आणि इटलीमध्ये ती खूप फेमस असली तरी जगभरात तिचे प्रचंड चाहते ...

Egypt-Italy clash over belly dancer! | बेली डान्सरवरून इजिप्त-इटलीत भांडण!

बेली डान्सरवरून इजिप्त-इटलीत भांडण!

सोहिला तारेक हसन. प्रसिद्ध बेली डान्सर. विशेषत: इजिप्त आणि इटलीमध्ये ती खूप फेमस असली तरी जगभरात तिचे प्रचंड चाहते आहेत. तरुण तर तिच्या डान्सने अक्षरश: पागल झाले आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे २२ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर लिंडा मार्टिनो या नावानं ती प्रसिद्ध आहे; पण अलीकडेच कैरो विमानतळावर उतरताच पोलिसांनी तिला अटक केली.

- का? तर उत्तेजक फोटो सोशल मीडियावर टाकल्याचा तिच्यावर आरोप आहे. खरं तर सोहिला ही इजिप्तचीच नागरिक, तरीही तिला त्यांच्याच राजधानीत म्हणजे कैरो विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतलं. अत्यंत तोकडे कपडे घालणं, जाणूनबुजून आपल्या अंगाचं प्रदर्शन करणं, अनैतिकता पसरवणं, देशाची संस्कृती खड्ड्यात घालणं..  इत्यादी कारणांनी लोकांनी तिच्यावर आरोपांची राळ उडवली होती. तिला अटक व्हावी, अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती.  

सोहिला इजिप्तची नागरिक असली तरी नंतर तिनं इटलीच्या नागरिकाशी लग्न केलं आणि ती इटलीमध्ये गेली; पण नवऱ्याशी तिचं फार काळ काही पटलं नाही. त्यामुळे लवकरच ती त्याच्यापासून विभक्त झाली; पण आपले बेली डान्सचे तिचे कार्यक्रम तिथेही सुरूच होते. तिच्या डान्सनं तरुणाईला अक्षरश: गारूड घातलं. इटलीच्या व्यक्तीशी विवाह केल्यामुळे तिच्याकडे इटलीचंही नागरिकत्व आहे. म्हणजेच इजिप्त आणि इटली या देशांचं दुहेरी नागरिकत्व तिच्याकडे आहे. 

आपल्या बेली डान्समुळे आणि एक यशस्वी प्रोफेशनल म्हणून तिनं आपल्या लग्नाआधीच इजिप्तमध्ये मोठं नाव कमावलं होतं. इजिप्तमधली आपली ही पॉप्युलॅरिटी कॅश करण्यासाठी ती पुन्हा इजिप्तला परतली; पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. तरुणाईमध्ये सोहिला प्रचंड लोकप्रिय असली तरी इजिप्तची ‘संस्कृती’ आणि त्यांचे कायदे अंगप्रदर्शनाला परवानगी देत नाहीत. अलीकडच्या काळात तर या संदर्भातील कायदेही आणखीच कडक झाले आहेत. एका बाजूला तरुणाई, दुसऱ्या बाजूला परंपराप्रिय नागरिक आणि कठोर झालेले कायदे. त्यामुळे कैरो विमानतळावर येताच सोहिलाला अटक करण्यात आली.  

सोहिलाकडे दुहेरी नागरिकत्व असल्यामुळे इजिप्तमध्ये तिला अटक झाल्यानंतर इटलीनं या संदर्भात नापसंती व्यक्त केली. आमच्या नागरिकाला अटक का केली, असा प्रश्न त्यांनी इजिप्तला विचारला. कैरो येथील इटलीच्या दूतावासानं सोहिलाच्या तत्काळ सुटकेची मागणी केली आणि तिच्याशी भेटीची परवानगीही मागितली. 

मानवाधिकार कार्यकर्त्यांनीही सोहिलाच्या अटकेची निंदा केली असली तरी नैतिकतेसंदर्भात इजिप्तचे कायदे अतिशय कठोर आहेत. इजिप्त सरकारनं या संदर्भात एक विशेष अभियानच सुरू केलं आहे. त्याअंतर्गत अन्य पाच बेली डान्सर्सनाही तिथे अटक करण्यात आली आहे. 

२०२०मध्ये डान्सर समा अल मसरीला उत्तेजक फोटो शेअर केल्यामुळे तीन वर्षांची शिक्षा आणि तीन लाख इजिप्शिअन पाैंडचा दंड झाला होता. इंटरनेटवर अश्लीलता पसरवणाऱ्या व्यक्तीला तिथल्या कायद्यानुसार किमान दोन वर्षांची शिक्षा, तीन लाख इजिप्शिअन डॉलर्सचा दंड होऊ शकतो. त्यामुळे सोहिलाच्या बाबतीतही कडक धोरण अवलंबण्यात आलं आणि तोच ‘न्याय’ तिला लावण्यात आला!

Web Title: Egypt-Italy clash over belly dancer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Italyइटली