Afghanistan Earthquake:अफगाणिस्तानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. पूर्व अफगाणिस्तानमध्येपाकिस्तानच्या सीमेजवळ झालेल्या तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक गावे उद्वध्वस्त झाली. या भुकंपामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तब्बल ६२२ वर पोहोचली आहे. तर ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु असून मृतांची आणि जखमींची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. या भूकंपाचे झटके पाकिस्तान आणि भारतातही जाणवले आहेत.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, अफगाणिस्तान तसेच दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रविवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपामुळे नांगरहार प्रांतातील जलालाबाद शहराजवळील कुनार प्रांतातील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, रात्री ११:४७ वाजता झालेल्या ६.० तीव्रतेच्या भूकंपाचे केंद्र नांगरहार प्रांतातील जलालाबाद शहराच्या पूर्व-ईशान्येस २७ किलोमीटर अंतरावर होते. फक्त आठ किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होते. कमी तीव्रतेच्या या भूकंपांमुळे अधिक नुकसान झालं.
कुनार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटलेकी, नूर गुल, सोकी, वाटपूर, मानोगी आणि चापादरे जिल्ह्यांमध्ये किमान २५० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ५०० जण जखमी झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने बचाव कार्य अजूनही सुरू असून अनेक गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. मृतांचे आणि जखमींचे आकडे बदलत असल्याचे सांगितले. कुनार, नांगरहार आणि राजधानी काबूलमधील वैद्यकीय पथके परिसरात पोहोचली आहेत. अनेक भागातून मृतांची संख्या नोंदवली गेली नाही. मृतांची आणि जखमींची माहिती मिळाल्यावर आकडेवारी बदलण्याची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, तालिबान-संचालित अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याचा हवाला देऊन रॉयटर्सने सांगितले की, पूर्व अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात किमान ६२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानातील भूकंपानंतर तालिबान सरकारने बचावकार्य तीव्र केले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भूकंपानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.