दहा किंवा अधिक मुले जन्माला घालून 'हीरो मदर' पदक मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 09:43 IST2025-10-26T09:42:58+5:302025-10-26T09:43:22+5:30
दाम्पत्याला अधिक मुले होण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता पुतीन यांनी काही योजना राबविल्या आहेत

दहा किंवा अधिक मुले जन्माला घालून 'हीरो मदर' पदक मिळवा
मॉस्को: गेल्या पंचवीस वर्षापासून रशिया हा घटत्या लोकसंख्येच्या आव्हानाला सामोरा जात असून, तिथे वृद्धांची संख्याही वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी कडक कायदे केले आहेत. दाम्पत्याला अधिक मुले होण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता पुतीन यांनी काही योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये मोठ्या आकाराच्या कुटुंबांतील मुलांना मोफत शालेय भोजन, दहा किंवा अधिक मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना 'हिरो मदर' या सोव्हिएत काळातील पदकाने सन्मानित करणे आदींचा समावेश आहे. १९९९ मध्ये म्हणजे पुतीन सत्तेवर येण्याच्या वर्षभर आधी, रशियातील जन्मदर हा आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. (वृत्तसंस्था)
आपल्या आजी, पणजींची परंपरा जतन करू
देशातील सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य राखून ठेवण्यासाठी लोकसंख्या संतुलन राखणे आवश्यक आहे, असे पुतीन यांनी सांगितले होते. त्यांनी मान्य केले की लोकसंख्येत लक्षणीय घट होण्याची समस्या रशियाला छळते आहे. देशातील जन्मदर वाढवणे, हे रशियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आजी आणि पणर्जीना सात, आठ किंवा त्याहूनही जास्त मुले होती. आपण या सुंदर परंपरा जतन करू या.
अशी घटली रशियातील लोकसंख्या, मृत्यू किती वाढले?
१९२० मध्ये रशियातील लोकसंख्या १४.७५ कोटी, २०२५ मध्ये १४.६१ कोटी.
२०१४ पासून क्रिमियाच्या २० लाख रहिवाशांचा रशियाच्या लोकसंख्येत समावेश. मात्र तो पुरेसा नाही.
२०१५ नंतर दरवर्षी जन्मदर घटला; मृत्यूंची संख्या वाढली.
२०२४ मध्ये केवळ १२.२ लाख जन्म -१९९९च्या नीचांकी आकड्याजवळ.
२०२४ मध्ये फलनदर (प्रतिस्त्री सरासरी मुलं) १.४. हा लोकसंख्या पुनर्स्थापन दर २.१पेक्षा कमी आहे.
लोकसंख्यावाढीसाठी उचलली ही पावले
रशियाच्या सरकारने 'गर्भपात प्रचार', 'चाइल्ड-फ्री विचारसरणी' आणि सर्व एलजीबीटीक्यू चळवळींवर बंदी घालणारे कायदे आणले.
पालकांसाठी रोख प्रमाणपत्रे -पेन्शन, शिक्षण किंवा अनुदानित गृहकर्जासाठी वापरता येतात.
काही प्रदेशांमध्ये गर्भवती किशोरवयीन मुलींना सुमारे १२०० रुबल्सची मदत
२० ते ३० वर्षे वयोगटातील महिलांची संख्या कमी असून, त्यांनी दहा किंवा अधिक मुले जन्माला घालावी, अशी रशियाच्या सरकारची अपेक्षा आहे.