‘येत्या १० वर्षांत प्रत्येक घरात ड्रोन’
By Admin | Updated: August 4, 2015 23:24 IST2015-08-04T23:24:51+5:302015-08-04T23:24:51+5:30
स्मार्ट फोनच्या आहारी गेलेल्या समाजाला नवी दिशा देणाऱ्या शास्त्रज्ञांनी आता समाजाचे लक्ष ड्रोनकडे वळविले असून, येत्या १० वर्षांत प्रत्येक नागरिकाच्या

‘येत्या १० वर्षांत प्रत्येक घरात ड्रोन’
वॉशिंग्टन : स्मार्ट फोनच्या आहारी गेलेल्या समाजाला नवी दिशा देणाऱ्या शास्त्रज्ञांनी आता समाजाचे लक्ष ड्रोनकडे वळविले असून, येत्या १० वर्षांत प्रत्येक नागरिकाच्या घरावर ड्रोन वा मानवरहित विमान असेल व ही उड्डयन क्षेत्रातील क्रांती असेल असे नासात काम करणाऱ्या एका मूळ भारतीय शास्त्रज्ञाने म्हटले आहे.
येत्या पाच ते दहा वर्षांत प्रत्येक घरात ड्रोन असेल व लोक साध्या साध्या गोष्टींसाठी त्यांचा उपयोग करतील. घराच्या छताची पाहणी करण्यापासून ते स्क्रू ड्रायव्हरच्या खरेदीसाठीही ड्रोन वापरले जाईल, असे नासाच्या सेफ आॅटोनॉमस सिस्टीम आॅपरेशन प्रोजेक्टचे व्यवस्थापक परिमल कोपडेकर यांनी म्हटले आहे. कॅलिफोर्निया येथील एम्स रिसर्च सेंटरच्या परिषदेत ते बोलत होते.
उड्डयन क्षेत्रात आपण आमूलाग्र बदल करू शकतो, असे गुगलच्या सिक्रेटिव्ह प्रोजेक्ट विंगचे प्रमुख डेव वोस यांनी सांगितले. गुगल व नासा खालच्या पातळीवर उडणाऱ्या छोट्या ड्रोनवर काम करत आहेत. आमच्याकडे १२५ सहकार्याचे प्रस्ताव असल्याचे कोपडेकर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)