Russia Ukrain War: रशियाच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी झटका, KFC-Pizza Hutt नं व्यवसाय गुंडाळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 22:12 IST2022-03-08T22:08:29+5:302022-03-08T22:12:37+5:30
जगातील अनेक देशांनी रशियावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. यातच आता अनेक मोठ-मोठ्या कंपन्याही रशिया विरोधात थेट अॅक्शन घेताना दिसत आहेत....

Russia Ukrain War: रशियाच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी झटका, KFC-Pizza Hutt नं व्यवसाय गुंडाळला!
रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा 13वा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रशियाने हे युद्ध पुकारल्यापासून जगातील अनेक देशांनी त्यांच्यावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. एवढेच नाही, तर अनेक मोठ-मोठ्या कंपन्याही आता रशिया विरोधात थेट अॅक्शन घेताना दिसत आहेत.
KFC-Pizza Hutt नं गुंडाळला व्यवसाय -
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता अनेक मोठ-मोठ्या कंपन्याही रशिया विरोधात समोर येताना आणि अॅक्शन घेताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणजे, आता KFC-Pizza Hutt ने रशियातून आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही अनेक कंपन्यांनी रशियातील आपला व्यवसाय गुंडाळला आहे.
रशियाच्या समर्थनात समोर आला चीन -
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असताना, सध्या अनेक देश न्यूट्रल आहेत. मात्र, यातच चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी रशियाचे उघडपणे समर्थन केले आहे. जग रशियावर जे निर्बंध लादत आहे, त्यामुळे सर्वांचेच नुकसान होणार आहे, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे. याच बरोबर, चर्चेतून समाधान काढावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दोन्ही देश झुकायला तयार नाहीत -
सद्यस्थितीत, रशिया आणि युक्रेन दोहोंपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नाही आणि हल्ल्यांची मालिकाही सुरूच आहे. सुमीमध्ये रशियाने 500 किलोचा बॉम्ब टाकल्याचा दावाही युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केला आहे. मारियुपोलमध्येही एका मुलाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. अशा स्थितीत दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होताना दिसत आहे.
12,000 हून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू? -
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रशियन सैन्याच्या कारवाईत आतापर्यंत 38 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 70 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय 13 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात एकूण 400 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, या युद्धात 12,000 हून अधिक रशियन सैनिक मारले गेल्याचा दावाही राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केला आहे.