America Advisory India Travel: भारतात फिरू नका! बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत; अमेरिकेची नागरिकांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 09:44 IST2022-01-26T09:43:59+5:302022-01-26T09:44:16+5:30
America Advisory India Travel: अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलने भारतात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून लेव्हल ३ स्तराची प्रवास आणि आरोग्य नोटीस जारी केली होती. यानंतर काही वेळातच बायडेन प्रशासनाने आणखी एक नोटीस काढली.

America Advisory India Travel: भारतात फिरू नका! बलात्कार, दहशतवादाच्या घटना वाढत आहेत; अमेरिकेची नागरिकांना सूचना
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या जो बायडेन प्रशासनाने आपल्या नागरिकांना भारतात न फिरण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना, बलात्कार आणि जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादामुळे भारतात कोणत्याही प्रकारचा प्रवास करणार असाल तर त्याचा पुनर्विचार करावा, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
महत्वाची बाब म्हणजे अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोलने भारतात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून लेव्हल ३ स्तराची प्रवास आणि आरोग्य नोटीस जारी करण्यात आली होती. यानंतर काही वेळातच बायडेन प्रशासनाने आणखी एक नोटीस काढून भारतात बलात्कार हा वेगाने वाढत चाललेल्या गुन्ह्यांपैकी एक होत चालला आहे, असे म्हटले आहे.
अमेरिकेने म्हटले आहे की, 'अमेरिकन नागरिकांनी दहशतवाद आणि नागरी अशांतता लक्षात घेता जम्मू आणि काश्मीर राज्यात (पूर्व लडाख प्रदेश आणि त्याची राजधानी लेह वगळता) प्रवास करू नये. भारत-पाकिस्तान सीमेच्या 10 किमी आत जाऊ नका, कारण सशस्त्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या रिपोर्टमध्ये बलात्कार हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक आहे, असे म्हटलेले आहे. लैंगिक अत्याचारासारखे हिंसक गुन्हे पर्यटन आणि इतर ठिकाणी घडले आहेत. यामुळे पुन्हा विचार करा.'
भारताला लेव्हल 3 ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये ठेवत, यूएस स्टेट डिपार्टमेंटने आपल्या नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवासाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'तुम्ही FDA-मान्यता मिळालेल्या लसीने पूर्णपणे लसीकरण केले असल्यास, तुम्हाला कोविड-19 ची लागण होण्याचा आणि गंभीर लक्षणे दिसण्याचा धोका कमी होऊ शकतो. कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी, कृपया लसीकरण न केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या प्रवाशांसाठी सीडीसीच्या विशिष्ट शिफारसींचा विचार करा.'