उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 05:50 IST2025-07-14T05:50:35+5:302025-07-14T05:50:48+5:30

द. कोरियाला घेऊन लष्करी आघाडी करू नका; किम जोंग उन यांच्या आण्विक धोरणाला पाठिंबा

Don't go against North Korea, Russia warns US-Japan | उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

सेऊल : हुकूमशहा किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखालील उत्तर कोरियाविरुद्ध लष्करी आघाडी उघडण्याचा अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानने प्रयत्न करू नये, असा इशारा रशियाने दिला आहे. अशी आघाडी कदापिही मान्य केली जाणार नाही, असेही या देशाने म्हटले आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी उत्तर कोरियाच्या दौऱ्यात हा इशारा दिला. वोन्सान शहरात त्यांनी किम जोंग यांचे विश्वासू व परराष्ट्रमंत्री चोई सोन हुई यांची भेट घेतल्यानंतर अमेरिका-जपान-द. कोरियाच्या या संभाव्य लष्करी आघाडीला रशियाचा विरोध असल्याचे स्पष्ट केले.  रशिया व उत्तर कोरियात सध्या मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. 

वोनसान शहरात बैठक
उत्तर कोरियाने वोनसान शहरात एक भव्य सागरी रिसॉर्ट उघडले आहे. येथे २० हजार लोकांची राहण्याची व्यवस्था आहे. पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नवाढीचा उत्तर कोरियाचा प्रयत्न असून विशेषत: रशियन पर्यटकांमुळे आर्थिक लाभ शक्य असल्याने शहरात दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही बैठक झाली.

तीन देशांचा लष्करी सराव
अमेरिका, जपान व दक्षिण कोरिया यांनी अशात लष्करी सराव वाढवला आहे. उत्तर कोरियाच्या कथित आण्विक कार्यक्रमाला सडेतोड प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने तीन देशांची ही एकी आहे. गेल्या शुक्रवारीच या देशांनी उत्तर कोरियाजवळ लष्करी सराव केला होता. 

अण्वस्त्रे विकसित करू द्या
उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रनिर्मितीचे प्रयत्न साहजिक असल्याचे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले. या देशाची संरक्षणाबाबतची गरज रशिया जाणून असल्याचे स्पष्ट करून लावरोव्ह यांनी युक्रेन युद्धात मदत केल्याबद्दल किम जोंग यांचे आभार मानले. 

रशियाला ही शंका
उत्तर कोरियाच्या निमित्ताने एकत्रित आलेले अमेरिका, जपान व दक्षिण कोरिया हे देश भविष्यात या भागातील कोणत्याही देशाला लक्ष्य करू शकतात, अशी शंका आणि भीती रशियाला आहे. 

भीती नेमकी काय?
रशियाने लष्करी साहित्य व आर्थिक मदत देऊ केली आहे. या प्रेमापोटी रशिया आता उत्तर कोरियाला संवेदनशील असे तंत्रज्ञानही देऊ शकतो, ही भीती अमेरिकेसह मित्र राष्ट्रांना आहे

Web Title: Don't go against North Korea, Russia warns US-Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.