ट्रम्प यांचे धक्कातंत्र, पॅरिस करारातून घेतली माघार; डब्ल्यूएचओमधून पडले बाहेर; बायडेन यांच्या काळातले ७८ निर्णय २४ तासांतच फिरवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 06:11 IST2025-01-22T06:07:50+5:302025-01-22T06:11:02+5:30
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळातले ७८ निर्णयही फिरवले आहेत.

ट्रम्प यांचे धक्कातंत्र, पॅरिस करारातून घेतली माघार; डब्ल्यूएचओमधून पडले बाहेर; बायडेन यांच्या काळातले ७८ निर्णय २४ तासांतच फिरवले
वाॅशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळातले ७८ निर्णयही फिरवले आहेत.
सत्तेवर आल्यावर ट्रम्प यांनी पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातल्या २०० देशांनी एकत्र येऊन हवामान बदलासाठी आणि
पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी केलेला हा अतिशय महत्त्वाचा करार आहे. याआधी २०१७ला ट्रम्प पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हाही अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतली होती. २०२१ मध्ये बायडेन सत्तेवर आल्यावर अमेरिका पुन्हा करारात सहभागी झाली.
आरोग्य संघटनेमधून बाहेर
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओ या महत्त्वाच्या संस्थेतून बाहेर पडण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. कोविड महासाथीच्या काळात डब्लूएचओने केलेल्या कामगिरीवर ट्रम्प यांनी टीका केली होती. त्यावेळीच त्यांनी संघटनेतून बाहेर पडण्याची सुरुवात केली होती. मात्र, नंतर बायडेन यांनी त्यांचा निर्णय रद्द केला होता.
कॅपिटॉल हिल हल्ला माफी
राष्ट्राध्यक्ष होताच, ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिल हिंसाचारासाठी अटक केलेल्या त्यांच्या सुमारे १,५०० समर्थकांना माफ केले. या लोकांनी काहीही चुकीचे केले नव्हते असे म्हणत, त्यांना ‘माफ’ केले आहे.
स्थलांतरावर बंदी
स्थलांतरितांसाठींच्या योजनेलाही ट्रम्प यांनी स्थगिती दिली. या योजनेअंतर्गत, क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला येथील ३० हजार स्थलांतरितांना अमेरिकेत येण्याची परवानगी दिली होती. (वृत्तसंस्था)
‘मेक्सिकोमध्ये राहा’
ट्रम्प यांनी मेक्सिकोहून येणाऱ्या निर्वासितांसाठी कार्यकारी आदेशही जारी केले आहेत. मेक्सिको सीमेवर जास्त सैनिक तैनात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जीव वाचविल्याचे बक्षीस
ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले होते. यावेळी शॉन करन यांनी ट्रम्प यांचा जीव वाचवला. आता ट्रम्प यांनी करन यांची गुप्तचर सेवेचे संचालक म्हणून नियुक्ती देत मोठे बक्षीस दिले.
टिकटॉक सध्या सुरू
ट्रम्प यांनी चिनी मालकीची सोशल मीडिया कंपनी टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या कायद्यावरील निर्देशावरही स्वाक्षरी केली आहे. आता टिकटॉकवरील बंदी ७५ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
मेक्सिको सीमेवर पुन्हा भिंत
अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर आणीबाणीच्या घोषणेचा एक भाग म्हणून, ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना ‘दक्षिण सीमेवर भिंत बांधण्याचे’ काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.हे निर्देश कार्यकारी आदेश नाहीत आणि अशा प्रयत्नांसाठी पैसे कुठून येतील हे स्पष्ट नाही.
सरकारी नियुक्त्या थांबवल्या
लष्करी आणि इतर काही भरती वगळता सर्व संघीय भरती थांबविण्याच्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ट्रम्प प्रशासन पूर्णपणे सत्ता हाती घेईपर्यंत ही बंदी कायम राहील.