झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 07:50 IST2025-05-22T07:49:57+5:302025-05-22T07:50:14+5:30
रामाफोसा १९ मे रोजी वॉशिंग्टनला पोहोचले होते. आफ्रिका आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले करण्यासाठी ते आले होते. परंतू झाले भलतेच.

झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...
युक्रेनची दुर्मिळ खनिजे मिळविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भर पत्रकार परिषदेत युक्रेनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी वाद घातला होता. तसाच वाद आज पुन्हा दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घालण्यात आला आहे. ट्रम्प आणि सिरिल रामाफोसा यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये हा वाद झाला. यावेळी ट्रम्प यांनी श्वेत नरसंहाराचा आरोप केला. तर रामाफोसा यांनी आमच्याकडे तुम्हाला द्यायला विमान नसल्याचा टोला लगावला.
रामाफोसा १९ मे रोजी वॉशिंग्टनला पोहोचले होते. आफ्रिका आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले करण्यासाठी ते आले होते. परंतू झाले भलतेच. ट्रम्प यांनी पत्रकारांसमोर रामाफोसा यांचा अपमान करण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांनी अचानक बातम्यांची कात्रणे काढली आणि रामाफोसा यांना वंशवादाच्या मुद्द्यावर बोलण्यास सुरुवात केली.
रामाफोसा यांनी ट्रम्प यांना खनिजे आणि व्यापारावर बोलायचे असल्याचे म्हटले आणि ट्रम्प यांनी श्वेतवर्णीय लोकांच्या हत्येचा व्हिडीओ प्ले केला. रामाफोसा यांना काही समजायच्या आत ट्रम्प यांनी बातम्यांची कात्रणे काढून दाखविण्यास सुरुवात केली. यामुळे रामाफोसा यांना काय बोलावे हे कळेना, यामुळे ते शांत बसले. व्हिडिओमध्ये हजारो श्वेतवर्णीय शेतकऱ्यांची थडगी दाखविली. यावर रामाफोसा यांनी आपण यापूर्वी असे काही पाहिले नाही, मला ठिकाण सांगा असे म्हटले. यावर ट्रम्प यांनी तुम्ही बघ्याची भूमिका घेत आहात, असा आरोप केला.
यावर रामाफोसा यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, आफ्रिकेत हिंसाचार वाढला आहे आणि सर्व जाती आणि वर्ग त्याच्याशी झुंजत आहेत. यात केवळ श्वेतवर्णीय नाही तर कृष्णवर्णीय लोक देखील मारले जात आहेत. मृतांत कृष्णवर्णीयच जास्त आहेत. माझ्या अमेरिकेच्या भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधील संबंध सुधारणे हा होता, जे १९९४ च्या वर्णभेदाच्या काळापासून सर्वात खालच्या पातळीवर आहेत. मी या प्रकाराची चौकशी करेन. यावेळी रामाफोसा यांनी कतार सरकारने ट्रम्प यांना भेट दिलेल्या शाही विमानावर टोला लगावला. मला वाईट वाटते की माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी विमान नाही, असे रामाफोसा म्हणाले.