डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:26 IST2025-12-22T12:25:45+5:302025-12-22T12:26:15+5:30
Donald Trump, US Ambassadors Recall: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २९ देशांतील अमेरिकन राजदूत परत बोलावण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये नेपाळ आणि श्रीलंकेचाही समावेश आहे. काय आहे यामागील 'अमेरिका फर्स्ट' धोरण? सविस्तर वाचा.

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच आपल्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणाची अंमलबजावणी आक्रमकपणे सुरू केली आहे. ट्रम्प प्रशासनाने एक मोठा निर्णय घेत जगभरातील २९ देशांमध्ये तैनात असलेल्या आपल्या राजदूतांना आणि वरिष्ठ मुत्सद्द्यांना तडकाफडकी परत बोलावले आहे.
नेमका निर्णय काय? ट्रम्प प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या राजदूतांची नियुक्ती बायडेन प्रशासनाच्या काळात झाली होती, त्यांची सेवा जानेवारीमध्ये समाप्त होणार असल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने 'करिअर डिप्लोमॅट्स'चा (अनुभवी मुत्सद्दी) समावेश आहे. विशेष म्हणजे हे राजदूत ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाही पदावर होते, मात्र आता त्यांना वॉशिंग्टनमध्ये परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ट्रम्प यांच्या या पावलामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अशा व्यक्तींची या पदांवर नियुक्ती करायची आहे, जे त्यांच्या 'अमेरिका फर्स्ट' या संकल्पनेला पूर्णपणे पाठिंबा देतील आणि त्यांच्या धोरणांनुसार काम करतील. हे बदल विशेषतः आफ्रिकन आणि आशियाई देशांमध्ये मोठे प्रभाव पाडणार आहेत.
कोणते देश प्रभावित?
या निर्णयाचा सर्वाधिक फटका आफ्रिकन देशांना बसला आहे. यामध्ये नायजेरिया, सोमालिया, युगांडा, सेनेगल यांसह एकूण १३ आफ्रिकन देशांचा समावेश आहे. आशिया खंडातून फिलीपिन्स, व्हिएतनाम, पापुआ न्यू गिनी आणि दक्षिण आशियातील नेपाळ व श्रीलंका येथील राजदूतांनाही बदलण्यात येणार आहे. युरोपमधील स्लोव्हाकिया आणि मॉन्टेनेग्रो यांसारख्या देशांतील राजदूतही या यादीत आहेत.
जरी या राजदूतांना परत बोलावण्यात आले असले, तरी त्यांच्या परराष्ट्र सेवेतील कऱ्या जाणार नाहीत. त्यांना वॉशिंग्टनमध्ये नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. दरम्यान, ट्रम्प आता या महत्त्वाच्या पदांवर आपल्या विश्वासातील व्यक्तींची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.